अभ्यासासाठी रागावणे बेतले आईच्या जिवावर
अभ्यास करताना मोबाइल पाहात असलेल्या मुलाला रागावल्याने बारावीतील मुलाने आईचा गळा दाबून खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लोणी काळभोर पोलिसांनी जिशान जमीर शेख (वय १८, रा. उरुळीकांचन) या मुलाला अटक केली आहे. तस्लीम जमीर शेख (वय ३७, रा. उरुळीकांचन) असे मरण पावलेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत पोलीस उपनिरीक्षक अमोल घोडके यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना उरुळीकांचन येथील माऊली कृपा इमारतीत १५ फेब्रुवारी रोजी दुपारी साडेतीन वाजता घडली.