बाहेर पडाल तर काळवंडाल

पुण्याच्या सर्वच भागात कुठे न कुठे बांधकामे सुरू आहेत. कुठे मेट्रोचे काम, तर कुठे उड्डाणपुलाचे बांधकाम सुरू आहे. जलवाहिनी, गॅसवाहिनी यांच्याही कामाची भर त्यात पडल्याचे दिसते. इमारतींची बांधकामेही यात आघाडीवर आहेत. यातून शहरात मोठ्या प्रमाणात धूळ निर्माण झाली आहे. त्याचा थेट दुष्परिणाम पुणेकरांच्या त्वचेवर होऊन त्वचा काळवंडली जात असल्याचे निरीक्षण वैद्यकीय तज्ज्ञांनी नोंदविले आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Sun, 19 Feb 2023
  • 04:08 pm
बाहेर पडाल तर काळवंडाल

बाहेर पडाल तर काळवंडाल

शहरभर बांधकामे सुरू असल्याने धुळीचा होतोय थेट त्वचेवर परिणाम

विजय चव्हाण

vijay.chavan@civicmirror.in

TWEET@vijayCmirror

पुण्याच्या सर्वच भागात कुठे न कुठे बांधकामे सुरू आहेत. कुठे मेट्रोचे काम, तर कुठे उड्डाणपुलाचे बांधकाम सुरू आहे. जलवाहिनी, गॅसवाहिनी यांच्याही कामाची भर त्यात पडल्याचे दिसते. इमारतींची बांधकामेही यात आघाडीवर आहेत. यातून शहरात मोठ्या प्रमाणात धूळ निर्माण झाली आहे. त्याचा थेट दुष्परिणाम पुणेकरांच्या त्वचेवर होऊन त्वचा काळवंडली जात असल्याचे निरीक्षण वैद्यकीय तज्ज्ञांनी नोंदविले आहे.

शहराच्या मध्यवस्तीच्या भागांसह बाणेर, शिवाजीनगर, नगर रस्ता परिसरात मेट्रोचे काम जोरदार सुरू आहे. सिंहगड रस्त्यावर उड्डाणपुलाच्या बांधकामाला गती मिळाली आहे. वेगवेगळ्या ठिकाणी टोलेजंग इमारती उभारण्यासाठी सतत बांधकामे सुरू आहेत. तसेच, अंतर्गत रस्त्यावर कुठे जलवाहिनी तर, कुठे गॅसवाहिनीच्या कामांसाठी खोदकाम केले जात आहे. यातून दिवसभरात पुणेकरांच्या त्वचेवर धूळ, धूर अशा प्रदूषकांचा थर तयार होतो. यामुळे पुणेकरांमध्ये त्वचा तडतडण्यासह त्वचेचे विकार वाढत असल्याचे निरीक्षण त्वचारोग तज्ज्ञांनी नोंदविले.

त्वचाविकार तज्ज्ञ डॉ मनीष शिसवे म्हणाले, ‘‘कोरडी हवा आणि वाढते तापमान आता धुळीस कारणीभूत ठरू लागले आहे.  त्यामुळे धूळ अंगावर आणि चेहऱ्यावर बसून आर्द्रता कमी होत आहे,’’ अशा स्थितीत त्वचेतील ओलावा कायम ठेवण्यासाठी मॉइश्चरायझर वापरण्याचा सल्ला देता येईल. बाहेरून आल्यावर अंघोळ करून ओलसर असलेल्या त्वचेवर मॉइश्चरायझर लावणे उपयुक्त ठरते. त्याचबरोबर उघड्या शरीरावरील त्वचेवर प्रदूषक घटक बसतात. हे टाळण्यासाठी पूर्ण शरीरभर कपडे घाला. विशेषतः शहरातून रस्त्याने फिरताना ही काळजी घ्या.’’

अन्य एका आहारतज्ज्ञाच्या मते, ‘‘त्वचेच्या मलमांवर खर्च करण्यापेक्षा फळे, पालेभाज्यांचे आहारातील प्रमाण वाढवा. त्यातून योग्य पोषणद्रव्य त्वचेला मिळतात. योग्य आहारातून त्वचेचे आरोग्य नैसर्गिकपणे चांगले राहते. घाम येईपर्यंत व्यायाम हा किमान निकष ठेवावा. त्यामुळे त्वचेची रंध्रे उघडतात आणि त्वचेवरील प्रदूषक घटक बाहेर पडण्यास मदत होते.’’ दिवसभर प्रदूषणातून फिरल्यामुळे त्वचेवर प्रदूषक घटकांचा थर जमा होतो. तो स्वच्छ करण्यासाठी कोमट पाण्याने दिवसातून दोन वेळा अंघोळ करण्याचा सल्लाही त्वचारोग तज्ज्ञांनी दिला.

 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story