कर्नाटकात उलटी गंगा!
#बंगळुरू
भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस सी. टी. रवी यांचे घनिष्ठ सहकारी आणि कर्नाटक भाजपमधील वजनदार लिंगायत नेते एच. डी. थिम्मया यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देऊन काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. कर्नाटक विधानसभेची निवडणूक तीन महिन्यांवर येऊन ठेपली असताना थिम्मया यांनी पक्ष बदलल्याने तिकीटवाटपावरून भाजपमध्ये तीव्र अंसतोष असल्याचे दिसून येते.
थिम्मया यांनी राजीनामा दिल्यानंतर कर्नाटक प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी या घटनेचे स्वागत केले असून थिम्मया यांनी कोणत्याही अपेक्षेशिवाय काँग्रेसमध्ये प्रवेश केला असल्याचे म्हटले आहे. भाजपच्या अनेक नेत्यांना काँग्रेसमध्ये प्रवेश करायचा आहे. मात्र, सध्या आपण कोणाचेही नाव जाहीर करणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले. थिम्मया चिकमंगळूर जिल्ह्याचे जिल्हा समन्वयक होते. विधानसभेसाठी उमेदवारी मिळावी म्हणून ते इच्छुक होते. १७ वर्षांहून अधिक काळ पक्षासाठी काम करताना त्यांनी विविध पदांवर काम केले होते. मात्र, त्यांना निवडणूक लढण्याची संधी मिळालेली नव्हती. मे मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी त्यांना चिकमंगळूरमधून उमेदवारी हवी होती.
थिम्मया आपल्या राजीनामा पत्रात म्हणतात की, २००७ पासून मी पक्षामध्ये वेगवेगळ्या पदावर काम केले आहे. मात्र, सध्याचे पक्षातील वातावरण निराशाजनक आहे. त्यामुळे पक्षाच्या जिल्हा समन्वयकपदाचा आणि प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे. गेली सतरा वर्षे विविध पदावर काम करताना राज्य पातळीवरील नेते, पक्ष पदाधिकारी, पक्षाच्या सर्व सेल आणि बोर्डाचे प्रमुख, सदस्यांनी मला केलेल्या सहकार्याबद्दल आपण आभार व्यक्त करतो आणि सर्वांना भविष्यासाठी सदिच्छा.
शनिवारी रात्र एका हॉटेलमध्ये पाचशे कार्यकर्त्यांसमवेत त्यांनी एक गुप्त बैठक घेऊन चर्चा केली. त्यामुळे त्यांच्यासमवेत हे कार्यकर्तेही भाजपला राम राम करण्याची शक्यता आहे.
राज्यात लिंगायत समाजाचे प्राबल्य आणि प्रभाव असून मतदारांमध्ये त्यांची संख्या साधारण १६ ते १७ टक्के एवढी आहे. लिंगायत समाज निवडणुकीत आपल्या पाठीमागे राहावा यासाठी भाजप प्रयत्न करताना दिसत आहे. मात्र, थिम्मया यांच्या राजीनाम्यामुळे मतदारांत चुकीचा संदेश जाऊन भाजपला फटका बसण्याची शक्यता राजकीय विश्लेषक व्यक्त
करत आहेत. वृत्तसंंस्था