आजी-आजोबा ठरले पाच वर्षांच्या नातीचे पालक
विजय चव्हाण
जन्मदात्या आईचा नैसर्गिक पालकत्वाच्या हक्काचा दावा फेटाळून पाच वर्षीय मुलीचा ताबा आणि पालकत्व आजी-आजोबांकडे देण्याचा आदेश अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. आय. पेरमपल्ली यांनी दिला. पाच वर्षांच्या नातीची इच्छा लक्षात घेऊन न्यायालयाने हा निर्णय दिला. आईही मुलीला आठवड्यातून एकदा भेटू शकते. तसेच तिला बाहेर फिरायला नेऊ शकते, असे न्यायालयाने निकालात स्पष्ट केले आहे.
सुमा आणि मनीष (बदललेली नावे) यांचे २०१६ मध्ये लग्न झाले होते. २०१८ मध्ये त्यांना मुलगी झाली. एप्रिल २०२२ मध्ये मनीष यांचे निधन झाले. सुमा यांनी महेश (बदललेले नाव) याच्याशी विवाह केला. दुसरे लग्न करीत असताना सुमा आणि तिच्या पहिल्या सासू-सासऱ्यांत समजुतीचा करारनामा झाला होता. ज्यामध्ये सुमा यांनी स्वखुशीने मुलीचा ताबा, देखरेख आणि पालकत्व सासू-सासऱ्यांकडे दिले होते. करारनामा झाल्यावर काही महिन्यांनंतर सुमा यांनी सासू-सासऱ्यांच्या विरोधात मुलीचा ताबा अनधिकृतपणे घेतल्याची तक्रार प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात दाखल केली.
त्यावर न्यायालयाने सारिका (बदललेले नाव) या मुलीची जन्मदाती हीच नैसर्गिक पालक असल्याने तिचा ताबा आईकडे देण्याचा आदेश सासू-सासऱ्यांना दिला.
निकालाच्या विरोधात आजी-आजोबांनी ॲॅड. गंधार सोनीस यांच्यामार्फत सत्र न्यायालयात दावा दाखल केला. 'मुलीचे पालकत्व, देखरेख, तिचे पालन-पोषण आणि शैक्षणिक खर्च आजी-आजोबा करीत आहेत. ते नैसर्गिक पालक नसले तरी मुलीचा त्यांच्याकडे असलेला ताबा अनधिकृत आहे, असे म्हणता येणार नाही.
मुलीच्या आईने ताबा मिळण्यासाठी केलेला दावा षडयंत्र आहे,' असा युक्तिवाद ॲड. सोनीस यांनी केला. सत्र न्यायालयात दाखल झालेल्या या दाव्यात न्यायालयाने मुलीशी संवाद साधला. तिची इच्छा जाणून सत्र न्यायालयाने मुलीचा ताबा आईकडे देण्याचा पूर्वीचा निकाल फेटाळून मुलीला आजी-आजोबांकडे सोपवले.
मुलांची कस्टडी (ताबा) आणि गार्डियनशिप (पालकत्व अधिकार) यात फरक आहे आणि तो समजून घेण्याची गरज आहे. मुलांचा ताबा म्हणजेच कस्टडी, यात शारीरिक ताबा असा अर्थ मुख्यत: अभिप्रेत असतो. मुलांचा शारीरिक ताबा म्हणजे मालकी हक्क नसून मुलांचा सांभाळ करण्याची जबाबदारी. मुलांची काळजी, त्यांचे पालनपोषण, त्यांचा सांभाळ, त्यांची जडणघडण, शिक्षण योग्य पद्धतीने व्हावे यासाठी आवश्यक ते सर्व निर्णय घेण्याचे अधिकार, असा त्याचा योग्य अन्वयार्थ लावायला हवा. बऱ्याचदा सूज्ञ, सुशिक्षित पालकांच्या ध्यानात 'जबाबदारी' हा अर्थ न घेता 'ताबा' हा अधिकारात्मक शब्द जास्त राहतो, असे निकालपत्रात नमूद करण्यात आले आहे.
मुलांचा ताबा आणि पालकत्वाच्या बाबतीत लिखित कायद्यापेक्षा, 'मुलांच्या सर्वोच्च हितसंबंधांचे संरक्षण' हा नियम वरचढ मानला जातो, असेही
निकाल सांगतो
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.