सावधान, तुमच्या ताटात मांगूर मासा तर नाही ना ?
सीविक मिरर ब्यूरो
आरोग्यासाठी घातक आणि स्थानिक प्रजातींचे मासे नष्ट करणाऱ्या मांगूर मासे पालनाची बेकायदा शेती उजनी पाणलोट क्षेत्रातील अनेक ठिकाणी सुरू असल्याचे नुकतेच निष्पन्न झाले आहे.
राष्ट्रीय हरित लवादाने बंदी घातलेल्या तसेच पर्यावरणास घातक असलेल्या मांगूर जातीच्या माशांची बेकायदा शेती केल्याप्रकरणी गेल्या आठवड्यात कालठण क्रमांक १ (ता. इंदापूर) येथील दोनजणांच्या बेकायदा मांगूर पैदास तळ्यातील हजारो किलो मासे जप्त केले. ही कारवाई पुणे मत्स्य व्यवसाय विभागामार्फत करण्यात आली.
माशांचे संवर्धन करताना कमी खर्चात अधिक उत्पादन मिळण्यासाठी या माशाला कोंबड्यांची घाण, खाण्यायोग्य नसलेले कोंबडीचे मांस, तसेच कत्तलखान्यातील कुजलेले शेळ्या, गाई, म्हशी यांचे मांस खाद्य म्हणून वापरले जाते. यामुळे पर्यावरणाचे प्रदूषण होत असल्याचे समोर आले आहे. याची गंभीर दखल घेत राष्ट्रीय हरित लवादाने मांगूर माशांच्या उत्पादनावर व विक्रीवर बंदी घातलेली आहे.
मत्स्य व्यवसाय विभागाचे सहायक आयुक्त ए. पी. नाखवा, म्हणाले, ‘‘राष्ट्रीय हरित लवाद आदेशानुसार मांगूर माशांच्या संवर्धनावर कायद्याने बंदी आहे. पर्यावरणासह, आरोग्याला हा मासा हानिकारक आहे. हे माहिती असूनही अशा माशांचे संवर्धन करणारे आणि संबंधितांच्या संवर्धन तलावांवर नियमित कारवाई केली जाणार आहे.’’
‘‘मांसात झिंक, कॅडमिअम, आर्सेनिकचे संक्रमणसुद्धा आढळून येते. मांस चरबीयुक्त असते आणि त्यात बॅक्टेरियाही असतात. त्याचे सेवन करणाऱ्या मांगूर माशांमुळे अनेक आजारांचा धोका असून डबक्यात, चिखलात, गटारात तो जगतो. थाय मांगूर मासा पाण्याव्यतिरिक्तही राहू शकतो’’ अशी माहितीही नाखवा यांनी दिली.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.