मोदी यांचा गुलाम
#मुंबई
निवडणूक आयोगाने धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना हे नाव काढून घेतल्यानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगासह भाजपवर जोरदार टीका केली आहे. निवडणूक आयोग हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा गुलाम आहे, असा घणाघात त्यांनी वांद्रे येथील कलानगरातून जीपवर उभे राहून केला.
आपल्या भाषणातून उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोग, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा तिखट शब्दांत समाचार घेतला. ते म्हणाले, ‘‘धनुष्यबाण कुणी चोरलं हे तुम्हाला माहीत आहे. त्यामुळे या चोरांना आणि चोर बाजाराच्या मालकांना निवडणुकीत गाडल्याशिवाय स्वस्थ बसायचं नाही. योगायोग असो काही असो, आज महाशिवरात्री आहे. या दिवसाचा मुहूर्त बघून शिवसेना हे नाव चोरलं गेलं. धनुष्यबाण चोरलं. त्यांनी मधमाश्यांच्या पोळ्याला दगड मारला आहे. आता त्यांना डंख मारण्याची वेळ आली आहे. निवडणूक आयोग मोदी यांचा गुलाम आहे. मी खचलो नाही, खचणार नाही. माझ्या हातात तुम्हाला द्यायला काही नाही. पण या गद्दारांना गाडल्याशिवाय राहायचे नाही.’’
सुनावणीदरम्यान निवडणूक आयोगाने काय काय सांगितलं होतं, हे रविवारी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून शिवसैनिकांसमोर मांडणार असल्याचे ठाकरे यांनी जाहीर केले. ‘‘एकेकाळी काँग्रेस फुटली होती. तेव्हा त्यांचं चिन्हं गोठवलं. ते कुणाला दिलं नव्हतं. कोणत्याही पक्षात वाद झाला तेव्हा मुख्य चिन्ह आणि नाव इतर कुणाला दिलं गेलं नाही. उलट चिन्ह गोठवून नवीन चिन्ह दिलं. हा इतिहास आहे, पण पंतप्रधानांच्या गुलाम आयुक्तांनी आपलं चिन्ह दुसऱ्यांना दिलं आहे.’’
‘‘निवडणूक आयोगाने विरोधात निकाल देऊनही मी संयम पाळलेला आहे. काल माझा चेहरा कसा होता? ज्याच्या हातात धनुष्यबाण होतं त्याचा चेहरा कसा होता? त्याचा चेहरा मीच चोर आहे अशी पाटी लावल्यासारखा होता. शिवरायांचा भगवा घेऊन मी तुमच्यासोबत राहील. शिवसैनिक जोपर्यंत जिवंत आहेत तोपर्यंत कुणाच्या कितीही पिढ्या आल्या तरी शिवसेना संपवू शकत नाही. आपण या गद्दारांना गाडून पुढे जाऊ,’’ अशा शब्दांत ठाकरे यांनी शिवसैनिकांमध्ये जोश भरण्याचा प्रयत्न केला.
उद्धव ठाकरे तसेच शिवसेनेच्या राजकीय इतिहासातील अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर आदित्य आणि तेजस ही दोन्ही मुले त्यांच्यासोबत दिसून येत आहेत. शनिवारी हजारो शिवसैनिक मातोश्रीबाहेर जमले होते. त्यावेळी तसेच कलानगर चौकात उद्धव ठाकरे यांनी भाषण केले तेव्हा आदित्य आणि तेजस उपस्थित होते. वृत्तसंंस्था
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.