पुण्यात ठाकरे-शिंदे गट आमने-सामने
#नवी पेठ
निवडणूक आयोगाने शिवसेना हे पक्षनाव तसेच धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह शिंदे गटाला देण्याचा निर्णय घेतल्यानंतर राज्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. शिंदे गटाकडून जल्लोष करण्यात येत असताना, ठाकरे गटाकडून या निर्णयाचा निषेध व्यक्त करण्यात येत आहे. या निकालानंतर राज्यभरात शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यामध्ये जोरदार संघर्ष पाहायला मिळत आहे. पुण्यातही दोन्ही गटांमध्ये राडा झाल्याची घटना समोर आली आहे.
निवडणूक आयोगाच्या या निर्णयाविरोधात अनेक ठिकाणी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून निषेध व्यक्त करण्यात येत आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि पक्षचिन्ह धनुष्यबाण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ताब्यात दिला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे माजी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिंदे गट यांचे कार्यकर्ते आमनेसामने येत आहेत. पुण्यात एका खासगी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमावेळी दोन्ही गटांचे कार्यकर्ते शनिवारी एकत्र आले होते. उद्धव ठाकरे यांच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. मुख्यमंत्री शिंदे यांच्या विरोधात घोषणाबाजी केल्यामुळे शिवसेना कार्यकर्त्यांनी देखील उद्धव ठाकरे यांच्या विरोधात घोषणाबाजीला सुरुवात केली. त्यामुळे नवी पेठेतील गांजवे चौक परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाचीदेखील झाली.
घोषणाबाजीमुळे वातावरण तापले
या कार्यक्रमाच्या ठिकाणी शिंदे गटाचे शहरप्रमुख नाना भानगिरे, अजय भोसले यांच्यासह पदाधिकारी आले. त्यावेळी ते पत्रकार संघातील आतील बाजूस कार्यकर्त्यांसोबत चर्चा करीत होते.
त्याच दरम्यान ठाकरे गटाचे शहरप्रमुख संजय मोरे हे त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांसह कार्यक्रमाच्या ठिकाणी आले. ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी ५० खोके एकदम ओके, गद्दार अशा घोषणा देण्यास सुरुवात केली. कोणत्याही प्रकारचा वाद होऊ नये हे लक्षात घेता केवळ ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांसोबत कार्यक्रम सुरू करण्यात आला. मात्र तरी देखील ठाकरे गटाचे कार्यकर्ते ५० खोके एकदम ओके आणि गद्दारच्या घोषणा सुरू राहिल्या.
अखेर शिंदे गटाचे शहरप्रमुख नाना भानगिरे यांनी देखील घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. त्यानंतर ठाकरे आणि शिंदे या दोन्ही गटांचे कार्यकर्ते समोरासमोर येत जोरदार घोषणाबाजी केली. यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. तेवढ्यात पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यावर दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना बाजूला करून परिस्थिती नियंत्रणात आणली.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.