नवाब मलिकांचा कोठडीतील मुक्काम १४ दिवसांनी वाढला
#मुंबई
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंधित कथित मनी लाॅंडरिंगप्रकरणी तुरुंगात असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी मंत्री नवाब मलिक यांचा कोठडीतील मुक्काम आणखी १४ दिवसांनी वाढला आहे.
ईडीने मलिक यांना मागच्या वर्षी फेब्रुवारीमध्ये अटक केली होती. त्यांच्या जामीन अर्जावर बुधवारी (दि. २२) सुनावणी झाली. जामीन नाकारण्यात आल्याने त्यांचा जेलमधील मुक्काम वाढला आहे. आतापर्यंत त्यांनी अनेकदा जामीन मिळविण्यासाठी अर्ज दाखल केले. मात्र, तो मंजूर करण्यात आलेला नाही.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नोव्हेंबर २०२१ मध्ये नवाब मलिकांवर गंभीर आरोप केले होते. १९९३ च्या मुंबई बाॅम्बस्फोट प्रकरणातील आरोपींकडून मलिक यांच्या कंपनीने जमीन खरेदी केल्याचा दावा फडणवीस यांनी केला होता. ‘‘ही जमीन दाऊद इब्राहिमशी संबंधित आहे. तसेच मलिक यांचे अंडरवर्ल्डशी संबंध आहेत,’’ असा आरोपही करण्यात आला. त्यानंतर ईडीने मनी लाँड्रिंगप्रकरणीही मलिकांवर गुन्हे दाखल करत त्यांची कोट्यवधींची संपत्ती जप्त केली.
‘‘नवाब मलिकांची एक किडनी निकामी झाली आहे. ते सध्या एकाच किडनीवर आहेत. कुर्ला येथील क्रिटी केअर रूग्णालयामध्ये ते अनेक महिन्यांपासून दाखल आहेत. किडनी ट्रान्सप्लांटसाठी त्यांना मोठ्या रूग्णालयात दाखल करायचे आहे. यामुळे त्यांना जामीन देण्यात यावा,’’ अशी मागणी मलिक यांच्या वकिलांनी केली होती.वृत्तसंस्था