उद्योगनगरीतील नेत्यांची ‘मविआ’च्या प्रचाराकडे पाठ
रोिहत आठवले
TWEET@RohitA_mirror
महाविकास आघाडीचे उमेदवार विठ्ठल ऊर्फ नाना काटे यांच्या प्रचाराकडे शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी पाठ फिरविली असून, अजित पवार शहरात दाखल होताच गायब असणारे नेते व्यासपीठावर गर्दी करताना दिसून येत आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहरातील एकमेव आमदार अण्णा बनसोडे, माजी महापौर योगेश बहल, मंगला कदम, उपमहापौर डब्बू आसवानी यांच्यासह शहर पातळीवरील अनेक नेते चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीकरिता आयोजित केलेल्या बैठका, प्रचार सभा, रॅलींमध्ये दिसून येत नाहीत, तर दुसरीकडे अजित पवार बैठकीला येतात तेव्हा नेते थेट व्यासपीठावर बसल्याचे पाहून कार्यकर्ते मात्र आता सैरभैर होऊ लागले आहेत. महाविकास आघाडीचे उमेदवार काटे यांना निवडून आणण्याकरिता राज्यभरातून नेत्यांची फौज शहरात दाखल होत असतानाच दुसरीकडे मात्र स्थानिक पातळीवरील चित्र वेगळेच असल्याचे आता बोलले जात आहे.
सर्वाधिक लोकसंख्या असलेला राज्यातील सर्वात मोठा दुसऱ्या क्रमांकाचा मतदारसंघ म्हणून चिंचवड मतदारसंघाची ओळख आहे. मावळ लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघांपैकी राज्यातील सर्वात दोन मोठे मतदारसंघ असणाऱ्या पनवेल आणि चिंचवड यांचा समावेश आहे. मावळमध्ये मागील लोकसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले होते. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार हे त्यावेळेस रिंगणात असतानादेखील चिंचवड मतदारसंघात राष्ट्रवादीच्या नेत्यांनी हातचे राखून काम केल्याचे निकालावरून दिसून आले होते. आता चिंचवडमध्ये पोटनिवडणूक लागल्यानंतरदेखील हीच परिस्थिती पाहायला मिळत आहे.
लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर राज्यातून प्रचारासाठी फौज गोळा करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसने पार्थ पवार यांना चिंचवडच्या प्रचारापासून दूर ठेवले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील नाराज गट तसेच भाजपमधील नाराज गट बंडखोर अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांचे काम करताना पाहायला मिळत आहे. दरम्यान, मंगळवारी काटे यांच्या प्रचारासाठी आदित्य ठाकरे आणि अजित पवार यांच्या रोड शोचे आयोजन करण्यात आले होते.
रात्रीस खेळ चाले...
महापालिकेतील अनेक माजी नगरसेवक दिवसा महाविकास आघाडीचे काम करत असल्याचे दाखवत असून रात्री मात्र विरोधी पक्षाचा प्रचार करत असल्याचे बोलले जात आहे. ‘नगरसेवक आणि स्थानिक नेते तुमची पाठ फिरताच कसे गायब होतात,’ असे राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांना विचारले असता, ‘‘त्यांना तुम्ही असे का करता, हे त्यांना विचारून तुम्हाला कळवतो,’’ असे सांगून त्यांनी यावर अधिक बोलणे टाळले.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.