अक्साई चीनमध्ये ड्रॅगन उभारणार रेल्वे मार्ग
#बीजिंग
चीनच्या विस्तारवादी धोरणामुळे जगासमोरील चिंता वाढली आहे. दक्षिण चिनी समुद्रात प्रभुत्व निर्माण करणाऱ्या चीनने अक्साई चीनची भूमी बळकावण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. अक्साई चीन बळकावण्यासाठी चीन या परिसरात एक रेल्वे मार्ग उभारणार आहे. अक्साई चीन आणि प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या सीमेजवळून हा रेल्वे मार्ग जाणार आहे. चीनच्या या नियोजनामुळे भारताची डोकेदुखी वाढणार आहे.
चीनच्या रेल्वे तंत्रज्ञान विभागाने या नव्या रेल्वे मार्गाच्या उभारणीची माहिती माध्यमांसमोर उघड केली आहे. चीनच्या अधिपत्याखालील तिबेटचे स्थानिक सरकार आणि चीन सरकारच्या रेल्वे विभागातर्फे हा नवा मार्ग उभारला जाणार आहे. चीन ते तिबेट दरम्यानच्या रेल्वे मार्गाचे जाळे १४ किलोमीटरवरून ४ हजार किलोमीटर अंतरापर्यंत विकसित करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. चीनचा हा रेल्वे मार्ग भारत आणि नेपाळच्या सीमेजवळून जाणार आहे. त्यामुळे भारत आणि नेपाळ या दोन्ही देशांच्या सीमेवरील परिसरात चीनच्या कुरापती वाढणार आहेत. तिबेटच्या शिगात्सेवरून हा मार्ग अक्साई चीनच्या झिजियांग येथे संपणार आहे. थोडक्यात चीन थेट
अक्साई चीनपर्यंत रेल्वे मार्गाच्या माध्यमातून आपला मालकी हक्क प्रस्थापित करण्याचा विचार करताे आहे.
हा रेल्वे मार्ग प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळून जात चीनने बळकावलेल्या रुतोग आणि पँगॉग खोऱ्यातून जाणार आहे. यातला पहिला टप्पा २०२५ पर्यंत पूर्णत्वास जाणार आहे. उर्वरित टप्पा २०३५ पर्यंत पूर्ण केला जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळील हालचालीत वाढ
या रेल्वे मार्गामुळे भारताच्या डोकेदुखीत वाढ होण्याची शक्यता आहे. अक्साई चीनचा भूभाग बळकावलेल्या चीनकडून रेल्वे मार्गाच्या माध्यमातून मालकी हक्क प्रस्थापित केला जाणार आहे. तसेच एकदा हा मार्ग उभारण्यात आला की, चीनच्या लष्कराच्या हालचालींना वेग येणार आहे. चीनने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळील परिसरात आपल्या सैनिकांच्या संख्येत वाढ केली असल्याचे १२ जानेवारीला भारतीय लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांनी सांगितले होते. १९५० साली चीनने बेकायदेशीररीत्या अक्साई चीनचा ३८ हजार चौरस किलोमीटर भूभाग बळकावला आहे. १९६२ सालच्या युद्धानंतर या भूभागावर आपला प्रभाव वाढवला. आता हा भूभाग आपल्या मालकीचा असल्याचे सिद्ध करण्यासाठी चीन येथे
रेल्वेमार्ग उभारत आहे. वृत्तसंस्था
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.