निवडणूक आयोगाचा निकाल दबावापोटी : सुनील केदार
सीविक मिरर ब्यूरो
केंद्रीय निवडणूक आयोगाने शिंदे गटाला शिवसेना हे नाव आणि चिन्ह देण्याचा निर्णय दबावाखाली घेतल्याची टीका काॅंग्रेस नेते आणि माजी मंत्री सुनील केदार यांनी मंगळवारी पुण्यात केली.
काँग्रेस भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत केदार म्हणाले, ‘‘ निकालाबाबत माझ्या मनात शंका आहे. याबाबत उद्धव ठाकरे हे सर्वाेच्च न्यायालयात गेले आहेत त्यामुळे आता याचा न्याय हा न्यायपालिका करेल. निवडणूक आयोगाने संबंधित निकाल दबावापोटी घेतला आहे, अशी शंका आहे.’’
केदार म्हणाले, ‘‘कसब्यातील विशिष्ट समाज ही भाजपची मक्तेदारी नाही. तो काही कोणाचा गुलाम नाही. त्यामुळे आता तेथे परिवर्तन होईल. २०१४ ते २०१९ दरम्यान नागपूर जिल्ह्यात भाजपाचे वर्चस्व होते. त्यानंतर आतापर्यंत झालेल्या निवडणुकांमधून भाजपाचे लोकप्रतिनिधी कमी होत चालले आहेत यावरून राजकीय वातावरण बदलत असून भाजपाचा जनाधार कमी होत चालला असल्याचे स्पष्ट होत आहे.’’
‘‘भाजपचे नेते केवळ आश्वासने देतात मात्र त्याची पूर्तता करताना दिसत नाहीत. त्यामुळे सुशिक्षित मतदार जागृत झाला असून केंद्रात आणि राज्यातील भाजपचे जुमलाबाजीचे सरकार अधिक काळ चालणार नाही,’’ अशी टीका केदार यांनी केली.
‘‘भाजपने स्मार्टसिटी बाबतची जी संकल्पना सांगितली त्याआधारे देशात एका तरी स्मार्ट सिटीचा विकास झाला आहे का ते भाजपने दाखवून द्यावे. पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना कामे कशी करायची हे समजले असते तर ते कोल्हापूर सोडून पुण्यात आलेच नसते,’’ असा चिमटादेखील केदार यांनी काढला.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.