त्यांना कुत्रा म्हणणार नाही कारण...
#मुंबई
आज काही लोक गळ्यात पट्टा बांधून भाजपसोबत गेले, हे बाळासाहेबांनी कधी शिकवले नाही. माझ्या वडिलांनी न्यायासाठी लढायला शिकवले. भाजपला लोकशाही मान्य नाही. सर्व संस्था लांडग्यांसारख्या विरोधकांवर सोडल्या आहेत. मी त्यांना कुत्रा म्हणत नाही, कारण कुत्रे प्रामाणिक असतात, अशा शब्दांत रविवारी उद्धव ठाकरेंनी भाजप, एकनाथ शिंदे यांच्यावर शरसंधान साधले.
शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण या पक्षचिन्हाबाबत निवडणूक आयोगाने निर्णय दिल्यापासून महाराष्ट्राच्या राजकारणात आरोप-प्रत्यारोप होत आहेत. रविवारी मुंबईत आयोजित उत्तर भारतीयांच्या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयाचा निषेध व्यक्त करताना एकनाथ शिंदे यांच्यावर टीकेचे आसूड उगारले. महाराष्ट्र आणि उत्तर भारतीयांचा संबंध जुना आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला काशीहून गागाभट्ट आले होते. निवडणूक आयोगाने आमचा धनुष्यबाण हिसकावला. मात्र तुमच्या रूपाने प्रभू श्रीराम माझ्यासोबत आले आहेत.
मी आव्हान दिले आहे. तुम्ही मर्द आहात, या मैदानात मी येतो, मशाल घेऊन. मग पाहू. राज्यात महाविकास आघाडी झाली. मात्र भाजपनेच काँग्रेससोबत जाण्यास भाग पाडले. पण मी भाजपला सोडले, हिंदुत्व सोडले नाही. भाजपचे जे हिंदुत्व आहे, ते आमचे हिंदुत्व नाही. बाळासाहेबांनी सांगितलेले हिंदुत्व आम्ही मानतो. आमचे हिंदुत्व राष्ट्रीयत्व, असेही उद्धव म्हणाले. माझ्या वडिलांच्या भाषेत सांगायचे तर राष्ट्रीयत्व हेच आमचे हिंदुत्व आहे. आमचे जे हिंदुत्व आहे ते देशाशी जुडलेले आहे. परंतु यांचे हिंदुत्व सांगते की आपसात भांडणे लावा, कुटुंबात भांडणे लावा, पक्षात भांडणे लावा आणि सत्ता मिळवा, असेही यावेळी उद्धव ठाकरे यांनी सांगितले. वृत्तसंंस्था
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.