आधी सवारी, मग तिकीटबारी
राजानंद मोरे
विनातिकीट रेल्वे प्रवाशांना पकडण्यासाठी विशेष मोहिमा राबविणारे रेल्वे प्रशासनच विनातिकीट प्रवासासाठी प्रवाशांना प्रवृत्त करत असल्याचे समोर आले आहे. तळेगाव स्थानकात फलाट क्रमांक एकवर सकाळी पावणेसहा वाजता लोणावळा येथून पहिली लोकल येते. त्यामुळे त्याआधीच फलाट क्रमांक एकवरील तिकीट खिडकी खुली करून प्रवाशांना तिकीट देणे अपेक्षित आहे. परंतु, ही तिकीट खिडकी त्या वेळेत बंद असते. प्रवाशांना पादचारी पुलावरून धावत-पळत फलाट क्रमांक दोन लगत असलेल्या खिडकीकडे जावे लागते. अनेकदा ज्येष्ठ नागरिक, महिलांना याचा त्रास होतो. त्यामुळे मग काही प्रवाशांना नाईलाजास्तव विनातिकीट प्रवास करावा लागत आहे.
प्रवाशांना सुलभपणे तिकीट काढता यावे यासाठी रेल्वेकडून तिकीट खिडक्यांची व्यवस्था योग्यप्रकारे करणे आवश्यक आहे. स्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वारावर तिकीट खिडकी, प्रवासी संख्येनुसार खिडक्या, एटीव्हीएम मशिन आदी सुविधा देणे अपेक्षित आहे. तळेगाव रेल्वे स्थानकात दोन फलाट आहेत. परिसरातून पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये येणाऱ्या प्रवाशांची संख्या हजारोंच्या घरात आहे. विद्यार्थी, छोटे-मोठे व्यावसायिक, खासगी-सरकारी नोकरदार, मजूर आदींकडून लोकलचा वापर केला जातो. सध्या स्थानकातील दोन्ही फलाटांवर तिकीट खिडकी आहे. फलाट क्रमांक दोनवरील तिकीट खिडकीच चोवीस तास खुली असते.
फलाट क्रमांक एकवरील खिडकी रात्री बंद झाल्यानंतर थेट सकाळी साडेसहा वाजता उघडते. पण त्याआधी पावणेसहाच्या सुमारास लोणावळा येथून एक लोकल फलाट क्रमांक एकवर येते. ही लोकल पाच वाजून वीस मिनिटाला लोणावळा स्थानकातून पुण्याकडे रवाना होते. पण तिकीट खिडकी बंद असल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होते. प्रवाशांना तिकिटासाठी धावत पळत फलाट क्रमांक एकवरून दुसऱ्या फलाटावर पादचारी पुलावरून जावे लागते. ही खिडकी फलाटावर नसून बाहेरच्या बाजूला आहे. तिथे जाऊन परत येईपर्यंत किमान दहा ते पंधरा मिनिटे जातात. ज्येष्ठ नागरिक, महिलांना पुलावरून चढउतार करणे शक्य होत नाही. त्यामुळे त्यांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याची स्थिती आहे.
मुंबई उच्च न्यायालयातील वकील ॲड नीतेश नेवशे हे या लोकलने अनेकदा पुण्यात येतात. याबाबत त्यांनी रेल्वे अधिकाऱ्यांकडे अनेकदा तक्रारही केली आहे. त्यावर अद्याप तोडगा काढण्यात आलेला नाही.
याविषयी ॲड. नेवशे म्हणाले की, फलाट क्रमांक एकवर पहिली लोकल येऊन गेल्यानंतर तिकीट खिडकी उघडते. त्यामुळे पहिल्या लोकलसाठी प्रवाशांना फलाट क्रमांक दोनवर जाण्याशिवाय पर्याय नसतो. स्थानकातील अधिकाऱ्यांना याबाबत अनेकदा सांगितले आहे. पण खिडकी उघडण्याची वेळ सकाळी साडेसहाची असल्याचे त्यांच्याकडून सांगितले जाते. तरीही यावेळेत कर्मचारी हजर नसतात. पावणेसातच्या सुमारास तिकिटे देण्यास सुरुवात होते. पूल चढून जाणे परत येताना चढून येणे हे खूप त्रासदायक आहे. याचा रेल्वे प्रशासनाने विचार करायला हवा.
अनेकदा प्रवासी लोकलच्या वेळेतच येतात. त्यामुळे तिकिटासाठी धावाधाव करावी लागते. अशावेळी घाईत अपघातही होऊ शकतो. तिकीट काढणे शक्य न झाल्यास मग काही वेळा प्रवाशांना विनातिकीटच प्रवास करावा लागतो.
प्रवाशांना तिकिटाशिवाय प्रवास करण्याची इच्छा नसते, पण रेल्वेच्या या कारभारामुळे त्यांना नाईलाजास्तव जावे लागते. त्यामुळे रेल्वेकडून फलाट क्रमांक एकवरील तिकीट खिडकी लोकल येण्याआधी उघडायला हवी. त्यामुळे प्रवाशांची सोय होईल आणि रेल्वेचेही नुकसान होणार नाही, अशी अपेक्षा ॲड. नेवशे यांनी व्यक्त केली. दरम्यान, रेल्वेकडून मात्र याबाबत हात वर करण्यात आले आहेत. फलाट क्रमांक दोनवरील तिकीट खिडकी सुरू असल्याने प्रवाशांची गैरसोय होत नाही, असे रेल्वेचे म्हणणे आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.