हिरामंडीचा पहिला लूक सोशल मीडियावर
मोठा गाजावाजा झालेल्या हिरामंडीचा पहिला लूक सोशल मीडियावर दाखल झाला आहे. संजय लिला भन्साळी दिग्दर्शन करत असलेला हिरामंडी नेटफ्लिक्सवर येणार आहे. भन्साळीच्या प्रत्येक प्रोजेक्टमध्ये भली मोठी स्टार कास्ट असते. हिरामंडीही त्याला अपवाद नाही.
मनीषा कोईराला, सोनाक्षी सिन्हा, आदिती राव हैदरी, रिचा चढ्ढा, शर्मिन सैगल, संजिदा शेख अशी फौज त्यात असून पहिल्या टीझरमध्ये या साऱ्याजणी पिवळ्या पोषाखात दिसतात. हिरामंडी लाहोरमधील वेश्यांच्या जीवनावर आधारित असून तेथील वेश्या व्यवसायाबाबत आपल्याला माहीत नसलेल्या अनेक गोष्टींचे दर्शन यातून होणार आहे. अर्थात यातील काळ हा स्वातंत्र्यपूर्व काळ असून त्यावेळच्या वेश्या जीवनाचे रहस्य आपल्यासमोर येणार आहे. संजय लिला भन्साळी एका वेगळ्या युगातील, एक वेगळे जीवन, एक वेगळा काळ घेऊन आपल्यासमोर येत असून ते पाहण्याची आम्हाला उत्सुकता आहे असे टीझरमधील पोस्टरवर म्हटले आहे. एका सुंदर आणि मनोरंजनाच्या विश्वाचे धावते दर्शन. एक नजर, एक कटाक्ष, एक आज्ञा, ज्यामुळे हिरामंडीतील सौंदर्यवती आपल्याला जिंकून घेतील, असेही पुढे म्हटले आहे.
हिरामंडीबाबत भन्साळी म्हणतात की, चित्रपटनिर्माता म्हणून माझ्या कारकिर्दीतील हिरामंडी एक महत्त्वाचा टप्पा आहे. लाहोरमधील वेश्या जीवन प्रथमच उलगडले जाणार आहे. त्यातील अनेक गोष्टी, घटना, जीवन पाहून प्रेक्षक अवाक होतील.
या भव्य प्रकल्पासाठी नेटफ्लिक्स बरोबर काम करणे आनंदाची बाब आहे. भन्साळी यांनी आतापर्यंत खोमोशी, द म्युझिकल ब्लॅक, देवदास, हम दिल दे चुके सनम, गुजारीश सारखे चित्रपट दिले आहेत. गेल्या वर्षी भन्साळींचा अलिया भट्ट प्रमुख भूमिकेत असलेला गंगुबाई काठियावाडी चाहत्यांच्या भेटीस आला होता.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.