एरोमॉल : रोगापेक्षा इलाज भयंकर

पुणे विमानतळाबाहेरील कॅब पॉईंटवर होणारी कोंडी कमी करण्यासाठी विमानतळ प्रशासनाने काही दिवसांपूर्वीच हा पॉईंट एरोमॉलमधील दुसऱ्या मजल्यावर हलवला आहे, पण अनेक वेळा प्रवाशांना त्याचा मनस्ताप सहन करावा लागत आहे. मॉलमध्येच कॅबची कोंडी होत असल्याने प्रवाशांना बराच वेळ थांबून राहावे लागत आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Sat, 18 Feb 2023
  • 12:20 pm

एरोमॉल : रोगापेक्षा इलाज भयंकर

कॅब बाहेर येण्यास लागतात ४५ िमनिटे, विमानतळाबाहेरील कोंडी टाळण्यासाठी केलेली उपाययोजना कुचकामी

राजानंद मोरे

rajanand.more@civicmirror.in

TWEET@rajanandmirror

पुणे विमानतळाबाहेरील कॅब पॉईंटवर होणारी कोंडी कमी करण्यासाठी विमानतळ प्रशासनाने काही दिवसांपूर्वीच हा पॉईंट एरोमॉलमधील दुसऱ्या मजल्यावर हलवला आहे, पण अनेक वेळा प्रवाशांना त्याचा मनस्ताप सहन करावा लागत आहे. मॉलमध्येच कॅबची कोंडी होत असल्याने प्रवाशांना बराच वेळ थांबून राहावे लागत आहे.

गिरीश अलवे हे दोन दिवसांपूर्वी बंगळुरू येथून विमानाने पुणे विमानतळावर उतरले. हा प्रवास एक तास १० मिनिटांचा होता. नंतर ते कॅबसाठी एरोमॉलमध्ये दुसऱ्या मजल्यावर रात्री सव्वा दहाच्या सुमारास पोहचले. पण मॉलमधून बाहेर पडण्यासाठी त्यांना पाऊण तास वाट पाहावी लागली. अलवे यांच्याप्रमाणेच गिरीश बारहाते यांनाही असाच अनुभव आला.

मल्टिलेव्हल कार पार्किंग तसेच खाद्यपदार्थांची दालने असलेल्या अत्याधुनिक एरोमॉलमध्ये दुसऱ्या मजल्यावर कॅबचा पॉईंट तयार करण्यात आला आहे. पूर्वी विमानतळाच्या आवारातच कॅब पॉईंट होता. पण त्यामुळे परिसरात वाहतूक कोंडी होत होती. प्रवाशांनाही वेळेत कॅब मिळत नव्हती. हा ताण कमी करण्यासाठी काही दिवसांपूर्वीच कॅब पॉईंट एरोमॉलमध्ये हलविण्यात आला. एरोमॉलमध्ये ये-जा करण्यासाठी विमानतळापर्यंत पादचारी पूल तयार करण्यात आला आहे. सुरुवातीला बहुतेकांनी या मॉलचे स्वागत केले. आता मात्र कॅब आणि प्रवाशांची गर्दी वाढू लागल्यानंतर समस्या समोर येऊ लागल्या आहेत.

विमानतळावरून बाहेर पडणाऱ्या प्रवाशांना कॅबसाठी एरोमॉलच्या दुसऱ्या मजल्यावर जावे लागत आहे. त्यासाठी आधी सर्व बॅगा घेऊन पायपीट करावी लागते. कॅबच्या ठिकाणी गेल्यानंतर तिथे लगेचच गाडीत बसता येत नाही. अनेकदा गाडी समोर दिसत असतानाही रांगांमुळे तिथपर्यंत जाणे शक्य होत नाही. कॅब येईपर्यंतच १० ते १५ मिनिटे लागतात. त्यानंतर बाहेर पडतानाही कॅबच्या रांगा असतात. असा अनुभव अनेक प्रवाशांना येत आहे. त्यामुळे प्रचंड नाराजी निर्माण होऊ लागली असून यात सुधारणा करण्याची मागणी प्रवासी करत आहेत.

एरोमॉलमध्ये नियोजनाचा अभाव असल्याचे सांगत अलवे म्हणाले, ‘‘मला बंगळुरूहून विमानाने पुण्यात येण्यासाठी १ तास १० मिनिटे लागली. एरोमॉलमध्ये जाण्याआधी कॅब बुक केली होती. मॉलमध्ये बरोबर १० वाजून २६ मिनिटांनी पोहचलो. तिथे गेल्यानंतर कॅबच्या लांबलचक रांगा लागल्या होत्या. मी बुक केलेली कॅब समोर रांगेतच दिसत होती. रांगेतून माझ्यापर्यंत येण्यासाठी १५ मिनिटे लागली. तिथून निघाल्यानंतर सुटका झाली नाही. पुढेही बाहेर पडण्यासाठी कॅबची रांग लागली होती. या रांगेत जवळपास अर्धा तास गेला. आम्ही ११ वाजून १० मिनिटांनी मॉलच्या बाहेर पडलो. हे खूपच त्रासदायक होते.’’

‘‘एवढा वेळ मॉलमध्ये जात असल्याने ज्येष्ठ नागरिक, लहान मुले वैतागून जातात. तिथे बसायचीही व्यवस्था नाही. रांगांमुळे कॅबचालक जोरजोरात हॉर्न वाजवत होते. त्याचाही त्रास प्रवाशांना होत होता. आधीच विमानतळाच्या इमारतीबाहेर पडल्यानंतर पादचारी पूल दुसऱ्या टोकाला आहे. सर्व सामान घेऊन तिथपर्यंत त्यावरून चालत जावे लागते. त्यानंतर तिथे कॅबची कोंडी होते, अशी नाराजी अलवे यांनी व्यक्त केली. विश्वास बारहाते यांनीही आपला अनुभव सांगितला. ते म्हणाले, मी परवा रात्री साडेबारा वाजता चेन्नई येथून विमानाने पुण्यात आलो. कॅब बुक करून एरोमॉलमध्ये पोहचलो. दहा मिनिटांत कॅब आली. पण पुढे बाहेर पडण्यासाठी ३५ ते ४० मिनिटे गेली. मी जवळपास १५ वर्षांपासून विमानप्रवास करत आहे. पण यापूर्वी कॅबसाठी एवढा वेळ कधीच लागला नव्हता. एरोमॉल चांगला असला तरी नियोजनाचा अभाव दिसतो. कॅबची ये-जा करण्यासाठी एकच मार्ग असल्याने टप्प्याटप्प्याने थांबवून बाहेर सोडल्या जातात. त्याचा फटका प्रवाशांना बसत आहे. यापूर्वी विमानतळाच्या आवारात कॅब मिळण्यासाठी वेळ लागला असला तरी एवढा वेळ जात नव्हता,’’ असेही बारहाते यांनी सांगितले.

कॅबचालकांमध्येही याबाबत काही प्रमाणात नाराजी आहे. याबाबत एक कॅबचालक म्हणाला, ‘‘कॅब दुसऱ्या मजल्यावर नेण्यासाठी आणि बाहेर पडण्यासाठी एकच मार्ग आहे. तसेच मार्ग अरुंद असल्याने कॉर्नरवर वेग खूपच कमी करावा लागतो. एकदा बाहेर जाणाऱ्या आणि एकदा आत येणाऱ्या कॅब सोडल्या जातात. त्यामुळे रांग लांबतच जाते. गर्दीच्या वेळी मग रांगा लागतात. कॅबचा पास नसेल तर मग तिथेही आणखी वेळ जातो. त्यामुळे प्रवासी अधिकच चिडचिड करतात.’

दरम्यान, एरोमॉल व्यवस्थापनाने हा दावा फेटाळला आहे. ‘‘पिक अवरमध्ये एकाचवेळी २०० ते २५० प्रवासी येतात. कॅबमध्ये सामान ठेवण्यासाठी काही वेळ लागतो. त्यामुळे गर्दी वाढते. पण बाहेर पडताना फारसा वेळ जात नाही. दररोज जवळपास साडे तीन हजार कॅबची ये-जा होते. बहुतेकांना पास देण्यात आले आहेत. काही जणांकडे पास नसल्याने पार्किंगचे पैसे भरण्यासाठी त्यांना थांबावे लागते. तिथेही वेळ जातो. इतर कारणांसाठी मात्र वेळ लागत नाही,’’ असे एरोमॉलची उभारणी करणाऱ्या पेबल्स इन्फ्राटेक लिमिटेडचे उपाध्यक्ष योगराज सिंग राजपूत यांनी स्पष्ट केले.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story