भाजप नेत्याच्या पतीची आत्महत्या
#नागपूर
अकोल्यातील भाजपाच्या ज्येष्ठ नेत्या नयना मनतकार यांचे पती अविनाश मनतकार यांनी नागपुरात रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या केल्याचे शनिवारी (दि. १८) समोर आले. आत्महत्येपूर्वी मनतकार यांनी सुसाईड नोटमध्ये बुलढाणा जिल्ह्यातील एक माजी आमदार आणि अकोला शहरातील एका पोलीस ठाणेदाराच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याच नमूद केले आहे.
अविनाश मनतकार यांनी नागपुरातील अजनी रेल्वे स्थानकाजवळ आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. अविनाश मनतकार यांच्या पत्नी नयना या भाजपाच्या प्रदेश कार्यकारिणी सदस्या आणि अकोला जिल्हा परिषदेच्या माजी सभापती आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मलकापूर अर्बन बँकेच्या भ्रष्टाचारप्रकरणी मनतकार दाम्पत्यावर आरोप झाल्याने ते व्यथित झाले होते. आत्महत्येपूर्वी मनतकार यांनी एक सुसाईड नोट लिहिल्याचंही समोर आले आहे. या सुसाईड नोटमध्ये बुलढाणा जिल्ह्यातील एक माजी आमदार आणि अकोला शहरातील एका पोलीस ठाणेदाराला आत्महत्येसाठी जबाबदार धरण्यात आले आहे.
अविनाश मनतकार यांनी मृत्यूपूर्वी लिहिलेल्या एका चिठ्ठीत भाजपचे मलकापूरचे माजी आमदार तथा भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष चैनसुख संचेती यांचे नाव घेतले आहे. संचेती हे तब्बल सहा वेळा भाजपाचे आमदार होते. मला आणि माझ्या पत्नीला बॅंकेच्या खोट्या भ्रष्टाचारात गोवण्यात आलं असल्याचं त्यांनी या पत्रात म्हटले आहे. या सोबतच लखानी नामक व्यक्तीचाही त्यांनी उल्लेख केला आहे. तर अकोला शहरातील रामदास पेठ पोलीस स्टेशनचे ठाणेदार किशोर शेळके यांनीसुद्धा तपासाच्या नावाने ३८ लाख रुपये उकळले असल्याचंही त्यांनी सुसाईड नोटमध्ये म्हटले आहे.
वृत्तसंंस्था
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.