नायडू रुग्णालय गाशा गुंडाळणार
राजानंद मोरे
सांसर्गिक आजारांसाठी असलेले एकमेव रुग्णालय नायडू लवकरच गाशा गुंडाळणार असून टप्प्याटप्प्याने ते बाणेरला हलविण्यात येणार आहे. नायडू रुग्णालयाच्या जागेतच पुणे महापालिकेच्या भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाचे काम वेगाने सुरू आहे. आता नायडूतील वॉर्ड क्रमांक सहाही पाडला जाणार आहे. पालिकेच्या भवन रचना विभागाने आरोग्य विभागाला वॉर्ड स्थलांतरित करण्यास सांगितले आहे. नायडूने गाशा गुंडाळल्यावर मध्यवर्ती भागातील रुग्णांची हेळसांड होणार आहे.
नायडू रुग्णालय हे सांसर्गिक आजारांसाठीचे एकमेव रुग्णालय आहे. स्वाईन फ्लू तसेच कोरोनाच्या महामारीमध्ये या रुग्णालयाने हजारो रुग्णांना जीवनदान दिले. या दोन आजारांसह क्षयरोग, गोवर तसेच संसर्गजन्य आजारांच्या रुग्णांवर येथे उपचार होतात. या रुग्णालयात बाह्यरुग्ण विभाग, मेडिकल, प्रयोगशाळाही आहे. रुग्णालयाची इमारत तसेच संपूर्ण परिसर वैद्यकीय महाविद्यालयाला देण्यात आला आहे. इमारतीच्या नूतनीकरणासह नवीन इमारती उभारणीचे काम वेगात सुरू आहे. ही कामे सुरू झाल्यानंतर सर्व विभाग वॉर्ड क्रमांक सहा, सातमध्ये हलविण्यात आले. नायडू रुग्णालयाच्या आवारातील इतर जुन्या इमारतीही टप्प्याटप्प्याने जमीनदोस्त होणार आहे.
दोन्ही वॉर्ड ब्रिटिशकालीन असून सुरुवातीला नवीन इमारत उभारणीपूर्वी याच वॉर्डमध्ये उपचार केले जात होते. महाविद्यालयासाठी हे दोन्ही वॉर्ड पाडण्याचे नियोजन आहे. भवन रचना विभागाने आठवडाभरापूर्वी याबाबत आरोग्य विभागाला कळविले. महाविद्यालयाचे काम वर्षभरात पूर्ण करण्याचे नियोजन आहे. सध्या भवन रचना विभागाने वॉर्ड सहा स्थलांतरित करण्याच्या सूचना आरोग्य विभागाला दिल्या आहेत. त्यानुसार आरोग्य विभागाने नियोजन सुरू केले आहे. सुरुवातीला तात्पुरत्या स्वरूपात सात क्रमांकाच्या वॉर्डमध्ये हा वॉर्ड हलविला जाऊ शकतो. नंतर संपूर्ण रुग्णालय बाणेरला हलविले जाईल. सध्या रुग्णालयात दाखल रुग्णांची संख्या चार ते पाच एवढीच आहे. त्यामुळे हे रुग्ण, अन्य विभाग वॉर्ड सातमध्ये हलविले जाऊ शकतात.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.