दोन मुस्लीम युवकांचे जळालेले मृतदेह मिळाले
#भरतपूर
गायींची तस्करी करत असल्याच्या संशयातून दोन मुस्लीम युवकांना कारमध्ये जिवंत जाळल्याची घटना उघड झाली आहे. हरयाणातील भिवानीत ही घटना घडली असून या प्रकरणी पोलीस चौकशी सुरू आहे. या दोन युवकांची नावे जुनैद आणि नासिर अशी असून दोघेही राजस्थानमधील आहेत. भरतपूरच्या डोंगराळ भागातील दोघेजण असून त्यांचा चुलत भाऊ इस्माईल याने तक्रार दिली आहे. तक्रारीत त्यांना मारहाण केली असून त्यानंतर ते दोघेजण बुधवारपासून बेपत्ता असल्याचे म्हटले आहे.
याबाबत इस्माईलने असं म्हटलं आहे की, जुनैद आणि नासिर या दोघांना बेदम मारहाण केल्यानंतर फिरोजपूर झिरका पोलीस ठाण्यात आणले होते. अन्य आरोपींच्या समवेत त्यांना ठाण्यातून पळवून लावले गेले. चौकशीसाठी आम्ही आलो तेव्हा ठाण्यात आम्हाला येऊ दिले नाही. त्या दोघांच्या बेपत्ता होण्याची तक्रार भरतपूर ठाण्यात करा असे सांगितले. त्यानंतर आम्हाला एक फोन आला आणि भिवानीजवळ एका गाडीत दोघांचे मृतदेह जळालेल्या अवस्थेत आढळल्याचे सांगण्यात आले. त्यांनी एवढे सांगितल्यावर ते जुनैद आणि नासिर असावेत अशी दाट शंका आली. दुसऱ्या दिवशी ही शकां खरी ठरल्याचे इस्माईलने सांगितले. बजरंग दलाच्या चार-पाचजणांनी दोघांना जाळले असावे असा संशय त्याने व्यक्त केला.
वृत्तसंंस्था