भांडखोर महिलांची पदावरून उचलबांगडी!
#नवी दिल्ली
महिलांची नळावरील भांडणं सगळ्यांचे लक्ष वेधून घेते. त्यातून बऱ्याचजणांचे मनोरंजन होते. असेच एक भांडण गेले काही दिवस कर्नाटकात गाजत असून त्याने जनतेचे लक्ष वेधून घेतले आहे. याचे कारण म्हणजे यातील दोन सहभागी महिला अधिकारी. दोघी महिला राष्ट्रीय प्रशासकीय सेवेतील असल्याने राज्य सरकारचे हात बांधलेले होते. अखेर मंगळवारी केंद्राने दोघींची पदावरून उचलबांगडी केली.
यातील एक अधिकारी डी. रूपा मुदगल असून त्या भारतीय पोलीस दलातील आहेत. दुसऱ्या अधिकारी भारतीय प्रशासन सेवेतील रोहिणी सिंदुरी या आहेत. गेले कित्येक दिवस दोघींतील वाद सुरू आहे. रूपा यांचे पती मुनिश मुदगल हेही भारतीय प्रशासन सेवेतील अधिकारी असून त्यांची प्रसिद्धी विभागाचे मुख्य सचिवपदी नेमणूक केली आहे. दोन महिला अधिकाऱ्यांतील वाद टोकाला गेल्याने गृह राज्यमंत्री अरागा जानेंंद्र यांनी इशारा देताना अधिकाऱ्याची वागणूक आक्षेपार्ह असल्याचे म्हटले होते.
रूपा यांनी रविवारी रोहिणी यांचे काही खासगी फोटो फेसबुकवर शेअर केल्याने वादाने टोक गाठले होते. रोहिणी या स्वत:चे फोटो पुरुष अधिकाऱ्यांना पाठवून सेवा नियमांची पायमल्ली करतात असा आरोप रूपा यांनी केला होता. मुख्य सचिव वंदिता शर्मा यांची भेट घेतल्यानंतर रूपा म्हणाल्या की, २०२१ आणि २०२२ मध्ये रोहिणी यांनी स्वत:चे फोटो तीन अधिकाऱ्यांना पाठवले होते. अशा प्रकारे फोटो पुरुष अधिकाऱ्यांना पाठवण्याचा नेमका अर्थ काय? हा काही खासगी विषय नाही. मला हे फोटो आता मिळाल्यानेच मी ते शेअर करत आहे. अगोदर मिळाले असते तर ते पूर्वीच शेअर केले असते. मी हे प्रकरण लावून धरणार आहे.
रूपा यांच्या आरोपाला उत्तर देताना रोहिणी म्हणतात की, ती काही माझी बॉस नाही, वरिष्ठ नाही, किंवा सरकार नाही. माझ्या खासगी जीवनातील निर्णयाबद्दल ती सार्वजनिक व्यासपीठावरून प्रश्न विचारू शकत नाही. एवढेच नव्हे तर ते सेवा नियमाचे उल्लंघन करणारे आहे. या प्रकरणी मी कायदेशीर कारवाई करणार आहे.
उचलबांगडीपूर्वी रूपा कर्नाटक हस्तकला विकास महामंडळाच्या कार्यकारी संचालक होत्या. रोहिणी या हिंदू धार्मिक संस्था आणि कल्याणकारी विभागाच्या आयुक्त होत्या. या दोघींची त्यांच्या पदावरून उचलबांगडी केली असून नवीन नियुक्ती जाहीर केलेली नाही. वादादरम्यान रूपा यांनी रोहिणी यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. त्याला उत्तर देताना सिंदुरी यांनी रूपा यांनी माझ्याविरोधात व्यक्तिगत बदनामीची मोहीम चालू केली असून त्याला कोणताही आधार नसल्याचे म्हटले आहे. तसेच रुपा यांनी सोशल मीडियावरून आणि व्हॉट्स ॲपवरील स्टेट्सवरून आपले फोटे घेतले असून त्याचा माझ्या बदनामीसाठी वापर करत आहेत. मी तीन अधिकाऱ्यांना फोटो पाठवल्याचा त्यांचा दावा असेल तर त्यांनी त्यांची नावे जाहीर करावीत, असेही रोहिणी म्हणतात.
रोहिणी यांचा जनता दल सेक्युलरचे आमदार महेश यांच्याबरोबरचा एक फोटो नुकताच सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. २०२१ मध्ये म्हैसूरमध्ये कार्यरत असताना रोहिणी आणि महेश यांनी परस्परांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. राजकीय नेत्यांना प्रशासकीय अधिकाऱ्यांनी भेटण्याची गरज काय, असा प्रश्न करत रूपा यांनी त्यांच्यात काही डील झाले आहे का अशी विचारणा केली होती. दोघींनी एकमेकींविरोधात केलेल्या आरोपाने राज्यातील जनतेचे फुकट मनोरंजन होत होते. मात्र, यामुळे राज्य सरकारची प्रतिमा खालावत चालली होती. दोघींनी एकमेकीं विरोधात मुख्य सचिवांकडे तक्रारी केल्या होत्या.
वृत्तसंंस्था