‘मति’रोधक
विशाल शिर्के
TWEET@vishal_mirror
शाळेजवळ असलेल्या वर्दळीच्या रस्त्यावरून विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे जाता यावे यासाठीचा स्पीडब्रेकर कसा नसावा याचे आदर्श उदाहरण पाहायचे असेल तर कोथरूडला भेट द्यावी लागेल. शाळेचे प्रवेशद्वार सुरू होण्यापूर्वी रस्त्याच्या दोन्ही बाजूला (एकदा मुले शाळेत प्रवेश करण्याच्या आणि दुसऱ्यांदा शाळेतून बाहेर पडण्याच्या बाजूला) स्पीडब्रेकर असावा हे सामान्य ज्ञान म्हणावे लागेल. मात्र, स्पीडब्रेकर उभारताना सामान्य ज्ञान किंवा मती वापरावी असे कोणाला वाटलेले दिसत नाही. एका साध्या चुकीमुळे म्हणजे गती रोधक रस्त्याच्या दोन्ही बाजूला पण एकाच दिशेने असल्याने हा मार्ग धोकादायक ठरला आहे. विद्यार्थ्यांना रस्ता ओलांडताना वेगवान वाहनांना सामोरे जावे लागते. कसरत हा शब्द कमी पडेल अशी स्थिती येथे असल्याचे सीविक मिररच्या पाहणीत समोर आले. कोथरूडमधील महात्मा फुले सोसायटीजवळ महेश विद्यालयातील हे चित्र आहे. विद्यार्थी, पालकांना दररोज जीव मुठीत धरूनच शाळेत येण्या-जाण्याची कसरत करावी लागते.
कोथरूड हे नियोजित उपनगर असल्याचे मानले जाते. त्यामुळे उपनगरातील या भागात अनेक आलिशान गृहसंकुले आहेत. रस्ते प्रशस्त झाले. रस्ते करताना त्यावरील स्पीडब्रेकर आणि इतर सुविधा पादचाऱ्यांना पूरक नसतील तर त्या कशा त्रासदायक असाव्यात याचे उत्तम उदाहरण येथे पाहायला मिळते. कोथरूडमधील महात्मा फुले सोसायटीजवळ महेश विद्यालय मराठी विद्यालय आणि महेश बाल भवन आहे. येथे पहिली ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची शाळा भरते. सकाळ आणि दुपार अशा दोन सत्रात शाळेतील वर्ग भरतात. कोथरूडमधील आशिष गार्डन परिसरातील हा रस्ता अत्यंत वर्दळीचा आहे. विद्यालयासमोर रस्ता दुभाजक असलेला भलामोठा रस्ता आहे.
सकाळी आणि संध्याकाळी शाळा सुटण्याच्या आणि भरण्याच्या वेळेस गर्दी होते. काही मुले पायी आणि काही सायकलवर येतात. काही पालक त्यांना सोडायला येतात. काहींसाठी व्हॅनची सुविधा आहे.
शाळेच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेर एक स्पीडब्रेकर आहे. तो सरळ रेषेत दोन्ही बाजूला गेलेला आहे. शाळेच्या समोरील दोन्ही रस्त्यांवर स्पीडब्रेकर उभारताना तो प्रवेशद्वारापूर्वी तयार करणे आवश्यक होते. त्यामुळे दोन्ही बाजूच्या वाहनांचा वेग शाळेच्या प्रवेशद्वारापूर्वीच कमी होईल. मात्र, शाळेच्या गेटसमोरील रस्त्यावर महात्मा फुले सोसायटीकडून शाळेकडे येणाऱ्या रस्त्यावरील स्पीडब्रेकर प्रवेशद्वारानंतर येतो. परिणामी शाळेच्या प्रवेशद्वारासमोरच वाहने वेगाने येतात. त्यामुळे पालकांना मुलांची शाळेतून ने-आण करताना कसरत करावी लागत आहे.
नम्रता भिसे म्हणाल्या, माझी मुलगी सहावीला आणि मुलगा आठवीला आहे. मुलगी सायकलने आणि मुलगा पायी शाळेत जातो. महात्मा फुले सोसायटीकडून शाळेकडे जाणाऱ्या रस्त्यावर वाहने जोरात असतात. येथील स्पीडब्रेकर नेमका शाळेचे प्रवेशद्वार संपल्यानंतर पुढे येतो. त्यामुळे वाहनांचा वेग प्रवेशद्वारासमोर कमी होत नाही. योग्य ठिकाणी स्पीड ब्रेकर बसवला पाहिजे. शाळेच्या वॉचमनला सांगून शाळा सुटण्याच्या वेळी दक्षता घेण्यास सांगितले आहे. मात्र, ते देखील किती वेळा लक्ष देणार.
शीतल गोडबोले म्हणाल्या, माझा मुलगा इथे सहावीत शिकतो. स्पीडब्रेकर चुकीच्या ठिकाणी असल्याने इथे अनेकदा लहान-मोठे अपघात झाले आहेत. त्यामुळे रस्ता ओलांडताना अधिक काळजी घ्यावी अशी सूचना मी मुलाला केली आहे. शाळेसमोरील स्पीडब्रेकर व्यवस्थित करायला हवा.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.