प्रोजेक्ट के जानेवारीत भेटीला!
बिग बी अमिताभ बच्चन, प्रभास आणि दीपिका पदुकोन एकत्र येत असलेल्या प्रोजेक्ट के या चित्रपटाची चाहते मोठ्या आतुरतेने वाट पाहात आहेत. मात्र, हा चित्रपट कधी रिलीज होईल याची कोणालाही कल्पना नव्हती. याची उत्सुकता आता संपली असून प्रोजेक्ट के च्या रिलीजची तारीख जाहीर झाली आहे. मात्र, त्यासाठी चाहत्यांना थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे. नाग अश्विनने दिग्दर्शित केलेला हा चित्रपट विज्ञान कथेवर आधारित आहे. हा चित्रपट पुढील वर्षी जानेवारीत प्रेक्षकांच्या भेटीला येईल. महाशिवरात्रीच्या दिवशी चित्रपटाची रिलीज डेट जाहीर करण्यात आली. विजयांती मूव्हीजच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त तयार करण्यात येणारा हा चित्रपट दोन भागात येणार आहे. कथेची गरज म्हणून तो दोन भागात तयार केला जात आहे. त्यातील पहिल्या भागात कथेची वैज्ञानिक पार्श्वभूमी मांडण्यात येणार आहे. बाहुबलीप्रमाणे दुसऱ्या भागात त्यातील संघर्ष भव्य प्रमाणात प्रेक्षकांना पाहावयास मिळेल. दोन्ही भागाचे एकाच वेळी चित्रीकरण सुरू आहे. मणीरत्नमच्या पोन्नीयन सेल्व्हनचे दोन भाग जसे एका वेळी प्रदर्शित झाले तसे प्रोजेक्ट के चे दोन्ही भाग एका वेळी प्रदर्शित होतील. मात्र, दोन्ही भागाच्या प्रदर्शनात साधारण वर्षाचे अंतर असेल असे मानले जाते. प्रोजेक्ट के भारताचा सर्वाधिक भव्य चित्रपट बनावा अशी निर्मात्यांची इच्छा आहे. चित्रपटाचे काम अंतिम टप्प्यात असून व्हीएफएक्स वर सध्या काम सुरू आहे. चित्रपटाची पहिली झलक दीपिकाच्या वाढदिवसादिवशी प्रदर्शित केली होती. हिंदी आणि तेलुगू अशा दोन्ही भाषांत चित्रपटाचे चित्रीकरण एकावेळी करण्यात आले.
अमिताभ बच्चन, प्रभास आणि दीपिका पदुकोन अशी तगडी स्टारकास्ट असल्याने साऱ्यांच्या अपेक्षा कमालीच्या वाढल्या आहेत. तसेच दिशा पटानीही चित्रपटात आहे. त्यामुळे शोले किंवा त्याहीपेक्षा हा चित्रपट भव्य बनावा यासाठी दिग्दर्शक नाग अश्विन प्रयत्नाची बाजी लावत आहे. दीपिका मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत आहे तर प्रभास एका वेगळ्या भूमिकेत प्रेक्षकांच्या समोर येईल. चित्रपटाचे निर्माते प्रेक्षकांची उत्कंठा ताणली जावी यासाठी त्याची झलक किंवा टिझर टप्प्याटप्प्याने सादर करत आहेत.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.