स्मृती मानधना बंगळुरूची कॅप्टन
#मुंबई
भारतीय संघाची आघाडीची फलंदाज स्मृती मानधनाकडे महिला प्रीमियर लीगमध्ये (डब्ल्यूपीएल) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
शनिवारी (दि. १८) सकाळी माजी फ्रँचायझी कर्णधार विराट कोहली आणि विद्यमान कर्णधार फाफ डुप्लेसी यांनी मानधनाची कर्णधारपदी नियुक्ती जाहीर केली. २६ वर्षीय भारतीय फलंदाज स्मृतीवर डब्ल्यूपीएलच्या लिलावात ३.४० कोटी रुपयांची बोली लावली. महिला प्रीमियर लीगच्या पहिल्या सत्रातील ती सर्वात महागडी खेळाडू ठरली.
सध्या भारतीय महिला संघाची उपकर्णधार असलेल्या स्मृतीकडे वेगवान फलंदाजी करण्याची क्षमता आहे. तिच्याकडे नेतृत्वगुणही आहेत. स्मृतीने भारतीय संघाचे नेतृत्व केले आहे. वयाच्या २२ व्या वर्षी ती टी-२० मध्ये संघाची कर्णधार होती. तसेच, ती महिला टी-२० चॅलेंजमध्ये ट्रेलब्लेझर संघाचीही कर्णधार होती.
स्मृतीने ११२ टी-२० सामन्यांत १२३.१३ च्या स्ट्राइक रेटने २,६५१ धावा केल्या आहेत. तिच्या नावावर २० अर्धशतकेही आहेत.
डब्ल्यूपीएल लिलावात स्मृती मानधना सर्वात महागडी खेळाडू ठरली. व्यतिरिक्त रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने रेणुका सिंग, सोफी डिव्हाईन, एलिस पेरी आणि ऋचा घोष यांनाही संघात घेतले आहे. ऑस्ट्रेलियाची ॲश्ले गार्डनर आणि इंग्लंडची नताली स्किव्हर ब्रंट या परदेशातील सर्वात महागड्या खेळाडू ठरल्या. दोघींनाही प्रत्येकी ३.२० कोटी रुपयांची बोली लाभली.
वृत्तसंंस्था