ही निवडणूक दुसऱ्या क्रमांकासाठी
रोिहत आठवले
TWEET@RohitA_mirror
तुमचा उत्साह पाहून निकाल स्पष्ट आहे. निवडणूक आता दुसऱ्या क्रमांकावर कोण असेल यासाठी होत आहे असे वाटते. शहरातील विकास पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात जसा विकास होत आहे, तसाच विकास दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या नेतृत्वाखाली पिंपरी-चिंचवडमध्ये झाला. लक्ष्मण जगताप हे कर्मठ कार्यकर्ते आणि विकासपुरुष होते. भाजपच जनतेचा विकास करू शकतो, हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांनी दाखवून दिले आहे. त्यामुळे पोटनिवडणुकीत एक मत चिंचवडच्या विकासाची परंपरा पुढे सुरू ठेवण्यासाठी द्या, असे आवाहन भाजप युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष व सर्वात तरुण खासदार तेजस्वी सूर्या यांनी रविवारी केले.
रहाटणी येथे भाजप युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष व युवा खासदार तेजस्वी सूर्या यांनी “व्हिजन न्यू इंडिया” या विषयावर युवकांशी संवाद साधला. यावेळी चिंचवड पोटनिवडणुकीतील भाजप-शिवसेना व मित्रपक्ष महायुतीच्या उमेदवार अश्विनी लक्ष्मण जगताप, भाजपचे शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे, भाजयुमोचे उपाध्यक्ष व आमदार राम सातपुते, भाजयुमोचे प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर, पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष संकेत चोंधे, प्रदेश प्रवक्ते एकनाथ पवार यांच्यासह भाजपचे सर्व माजी नगरसेवक, पदाधिकारी व युवक उपस्थित होते.
तेजस्वी सूर्या म्हणाले, “दिवंगत लक्ष्मण जगताप यांनी काय विकासकामे केली आहेत हे आपण पाहातच आहोत. त्यांनी मतदारसंघात विकासात्मक काम केले आहे. देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली जे काम झाले, तेच काम लक्ष्मण जगताप यांच्या नेतृत्वाखाली येथे झाले आहे. ते भाजपचे कर्मठ कार्यकर्ते व लोकनेते होते. शहरातील प्रत्येक विकासात त्यांची छाप आहे. कार्यकर्ता कसा असावा याचा आदर्श त्यांनी निर्माण केला. त्यांच्या एका मतामुळेच राज्यात परत भाजपची सत्ता आली. त्यांची विकासाची परंपरा पुढे नेण्याची संधी पोटनिवडणुकीत प्राप्त झाली आहे. त्यांचे ऋण परत देण्याची संधी आपल्यासमोर आहे. पोटनिवडणुकीत भाजपचाच विजय निश्चित आहे. हा विजय ऐतिहासिक आणि अभूतपूर्व होण्यासाठी भाजपच्या कार्यकर्त्यांनी घराघरापर्यंत जाऊन, मतदारांशी थेट संपर्क करावा. त्यांना मतदान केंद्रापर्यंत आणून मतदान करून घ्यावे. मतदारांनी घराबाहेर पडून एक मत चिंचवडच्या विकासासाठी द्यावे.
नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान झाल्यानंतर नव्या भारताचा उदय झाला. विकासकामांना गती आली आहे. देशाची आर्थिक विकासाकडे वाटचाल सुरू झाली आहे. देशभर रस्ते कामांची मोठ्या प्रमाणात निर्मिती होत आहे. देशाच्या सीमा सुरक्षित करणारे काम होत आहे. सगळीकडे नवीन काही तरी उभे केले जात आहे. राहुल गांधी ज्या रस्त्यांवरून फिरून 'भारत जोडो' यात्रा करत होते, ते मोदी यांनी तयार केले होते. भाजप विकासाच्या माध्यमातून देश बांधणारा पक्ष असून, काँग्रेस विकास नष्ट करणारा पक्ष आहे. भाजपच या देशाला विकास देऊ शकतो, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी आमदार महेश लांडगे, भाजपचे प्रदेश प्रवक्ते एकनाथ पवार, भाजयुमोचे प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर आणि भाजयुमोचे शहराध्यक्ष संकेत चोंधे यांनीही उपस्थितांशी संवाद साधला.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.