निवडणुकीसाठी सगळं माफ
राजानंद मोरे
पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपीएमएल) तीन दिवसांपूर्वीच ‘अटल’ ही पाच रुपयांत मिळणारी बससेवा तोट्याचे कारण देत बंद केली. पुण्यदशम ही सेवाही सध्या तोट्यातच सुरू आहे. पण ही सेवा सध्यातरी बंद करणार नसल्याचे प्रशासनाकडून सांगितले जात आहे. दिवसेंदिवस तोटा वाढत असूनही ही सेवा बंद न करण्यामागे राजकीय गणिते असल्याची चर्चा आहे. सध्या कसबा विधानसभेची पोटनिवडणूक सुरू असून भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रचारात पुण्यदशमचा मुद्दाही आहे.
पीएमपीने जुलै २०२१ मध्ये पुण्यदशम ही बससेवा सुरू केली. एकदा दहा रुपयांचे तिकीट काढल्यानंतर या बसने दिवसभर त्याच तिकिटावर फिरता येते. सध्या शहराच्या मध्यवस्तीतील नऊ मार्गांवर ही सेवा ५० बसेसमार्फत सुरू आहे. स्वारगेट, डेक्कन, शिवाजीनगर, पुणे स्टेशन आणि पूलगेट या प्रमुख ठिकाणांना जोडणाऱ्या या सेवेअंतर्गत प्रत्येक बस दिवसभरात सरासरी १४० किलोमीटर धावते. या बसला प्रवाशांचा प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याचा दावाही पीएमपी प्रशासनाकडून केला जात आहे. प्रत्यक्षात केवळ गर्दीच्या वेळेत विशिष्ट मार्गांवर बसला गर्दी होते. त्यातही बस केवळ नऊ मीटरच्या असल्याने त्यात प्रवासी संख्याही फारशी नसते.
पीएमपी प्रशासनाने दिलेल्या आकडेवारीनुसार, जानेवारी महिन्यात पुण्यदशम सेवेतून पीएमपीला ५८ लाख ७८ हजार ९८५ रुपयांचे उत्पन्न मिळाले. तर एकूण प्रवासी संख्या ११ लाख ७५ हजार ७९७ एवढी होती. आतापर्यंतचे हे एका महिन्यातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक उत्पन्न आहे. यापूर्वी ऑगस्ट महिन्यात सुमारे ५९ लाख रुपये उत्पन्न मिळाले होते. दररोज ५० बस सरासरी १४० किमीप्रमाणे सुमारे सात हजार किमी धावतात. त्यानुसार जानेवारी महिन्यात दररोज प्रतिकिमी उत्पन्न २८ रुपये एवढे मिळत आहे, तर पीएमपीचे ६ ते १२ फेब्रुवारी या कालावधीतील सरासरी प्रतिकिमी उत्पन्न ४७ रुपये एवढे होते. याचा अर्थ पीएमपीच्या सरासरी उत्पन्नाएवढे उत्पन्नही पुण्यदशम सेवेला मिळत नाही. तर दुपटीहून अधिक खर्च पीएमपीला करावा लागतो.
पुण्यदशम सेवेच्या सर्व ५० बस खासगी ठेकेदाराकडे देखभाल-दुरुस्तीसाठी दिल्या जातात. त्यासाठी पीएमपीला पैसे मोजावे लागतात. रोजचा चालक-वाहक व इंधनावरील खर्चही आहे. इतर बससेवांचीही हीच स्थिती आहे. दररोज मिळणारे सुमारे पावणे दोन कोटी रुपयांच्या उत्पन्नाच्या तुलनेत होणारा खर्च अधिक असल्याने दिवसागणिक तोटा वाढतच चालला आहे. त्यातच इंधन दरवाढीने तर पीएमपीचे कंबरडे मोडले आहे. याबाबत पीएमपीचे अधिकारीही कबुली देतात. इंधन दरवाढीनंतर तिकीट दरवाढ झालेली नाही. पीएमपीकडून हा प्रस्ताव आणण्याचा प्रयत्नही झाला होता. पण त्यामध्ये अपयश आले. तोटा कमी करण्यासाठी प्रशासनाकडून काही मार्ग बंद करण्यात आले. अटल सेवेचे तिकीट पाचवरून नियमित करण्यात आले. पण पुण्यदशमबाबत प्रशासनाला हे धाडस दाखवता आलेले नाही.
अटल सेवा सुरू करण्याचा निर्णय अध्यक्षांनी त्यांच्या पातळीवर घेतला होता, तर पुण्यदशम सेवा पुणे महापालिकेने सुरू केली आहे. तत्कालीन स्थायी समिती अध्यक्ष व सध्याचे कसबा पोटनिवडणुकीतील भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांच्या काळात ही सेवा सुरू झाली आहे. त्यावेळी बरीच जाहिरातबाजीही झाली. आताही प्रचारात हा मुद्दा आहे. पीएमपीच्या संचालक मंडळानेही या सेवेवर शिक्कामोर्तब केले होते. त्यामुळे सध्याचे पीएमपीचे अध्यक्ष व व्यवस्थापकी संचालक ओमप्रकाश बकोरिया यांना त्यांच्या पातळीवर ही सेवा थांबविण्याचा निर्णय घेता येत नसल्याचे समजते. संचालक मंडळाच्या मान्यतेशिवाय ते शक्य होणार नाही. तसेच सध्या निवडणुकीचे वातावरण असून सेवा बंद केल्यास त्याचा फटका बसू शकतो, त्यामुळे हा प्रस्तावही नुकत्याच झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत आणला गेला नाही, अशी चर्चा आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.