तब्बल शंभर वर्षांनंतर पोहचले पत्त्यावर पत्र
#लंडन
संपर्काच्या आधुनिक संसाधनांच्या जोरावर, पोस्ट, तार विभागाच्या माध्यमातून जगावर अधिराज्य गाजवणाऱ्या इंग्रजांची आणि इंग्लंडची वाहवा केली जाते, त्या इंग्लंडच्या पोस्ट खात्याच्या आळशीपणाबद्दल तुम्ही कधी ऐकले आहे का? अशीच मजेशीर गोष्ट समोर आली आहे. १९१६ साली पोस्ट केलेले एक पत्र तब्बल १०० वर्ष उलटून गेल्यावर संबंधित पत्त्यावर पोहचले असल्याचे समोर आले आहे.
१९१६ साली एक पत्र लंडनच्या क्रिस्टल पॅलेस परिसरातील एका पत्त्यावर पाठवण्यात आले होते. हे पत्र त्या पत्त्यावर २०२१ ला पोहचले असल्याचा प्रकार समोर आला आहे. रॉयल मेलला हे पत्र संबंधित पत्त्यावर पोहचवण्यासाठी एवढी वर्षे का बरे लागली असतील? असा प्रश्न उपस्थित होत आहे. १९१६ साली हे पत्र पोस्टाच्या लाल पेटीत टाकले गेले. मात्र तिथून ते हरवले असावे, असे सांगण्यात आले आहे.
कोणी कोणासाठी पाठवले होते ?
या पत्रावर जॉर्ज पंचम यांचे छायाचित्र असणारे एक पेनी किमतीचे तिकीट चिकटवलेले आहे. तसेच बाथ आणि सिडनहॅम पोस्ट कार्यालयाचा शिक्का मारलेला आहे. २०२१ ला हे पत्र नाट्य दिग्दर्शक फिन्ले ग्लेन यांच्या पोस्ट बॉक्समध्ये टाकण्यात आले. ग्लेन हे क्रिस्टल पॅलेस परिसरात एका सदनिकेत वास्तव्य करतात. गम्मत म्हणजे हे पत्र कोण्या मार्शसाठी लिहिण्यात आले होते. मार्श यांची मैत्रीण क्रिस्ताबेल मेनेल यांनी ते लिहिले होते. मेनेल त्यावेळी बाथमध्ये सुटीचा आनंद घेण्यासाठी आल्या होत्या. कदाचित हे पत्र सिडनहॅम पोस्ट कार्यालयाकडून गहाळ झाले असावे. कारण त्या कार्यालयाच्या नूतनीकरणाचे काम सुरू होते. विशेष म्हणजे ज्या पत्त्यावर हे पाठवण्यात आले तो बंगला पाडून टाकण्यात आला होता. तिथे नव्या इमारतीचे बांधकाम सुरू होते. हे पत्र ज्या ग्लेन यांना मिळाले आहे, ते म्हणाले की, मला वाटले यावरील तारीख २०१६ असावी, चुकून त्यावर १९१६ छापले गेले असावे. मात्र काळजीपूर्वक बघितल्यावर माझी खात्री पटली. १०० वर्षांपूर्वीचे पत्र असूनही त्याचा लिफाफा चांगल्या अवस्थेत असल्याचे ग्लेन यांनी सांगितले आहे.
वृत्तसंंस्था
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.