कांगारूंची धाव पुन्हा अडीच दिवसांचीच!
#दिल्ली
सलग दुसऱ्या कसोटी सामन्यात अवघ्या अडीच दिवसांत कांगारूंच्या नांग्या ठेचण्याची करामत भारतीय क्रिकेट संघाने करून दाखवली. रविवारी (दि. १९) फिरकीपटू रवींद्र जडेजाने घेतलेल्या ७ बळींच्या जोरावर ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव नाट्यमयरित्या ११३ धावांवर गुंडाळून भारताने ६ विकेटने सहज सामना जिंकला. या सलग दुसऱ्या विजयामुळे जागतिक कसोटी अजिंक्यपद मालिकेतील अंतिम फेरीत टीम इंडियाचा प्रवेश जवळजवळ निश्चित झाला आहे.
३४ वर्षीय डावखुरा फिरकीपटू जडेजाने केलेल्या अफलातून माऱ्यामुळे कांगारूंचा दुसरा डाव दुसऱ्या दिवसअखेरच्या १ बाद ६१ वरून रविवारी पहिल्या सत्रातच ३१.१ षटकांत ११३ धावांवर आटोपला. जडेजाने ४७ धावांत ७ गडी बाद केले. उर्वरित ३ बळी रविचंद्रन अश्विनने घेतले. विजयासाठी ११५ धावांचे माफक आव्हान असताना भारतीयांनी ऑस्ट्रेलियाच्या फिरकी गोलंदाजांचा दबाव न घेता आक्रमक धोरण स्वीकारले. परिणामत: २६.४ षटकांत ४ फलंदाजांच्या मोबदल्यात ११८ धावा करीत भारताने विजयावर शिक्कामोर्तब केले. १०० वी कसोटी खेळणारा चेतेश्वर पुजाराने (नाबाद ३१) विजयी चौकार मारला. दुसरीच कसोटी खेळणारा यष्टीरक्षक-फलंदाज श्रीकर भरत २३ धावांवर (२२ चेंडूंत १ षटकार, ३ चौकार) नाबाद राहिला. संपूर्ण सामन्यात मिळून ११० धावांत १० बळी आणि २६ धावा अशी कामगिरी करणारा जडेजा ‘प्लेअर ऑफ द मॅच’ ठरला. यापूर्वी नागपुरात झालेल्या पहिल्या कसोटीत अवघ्या अडीच दिवसांत भारताने कांगारूंना डावाच्या फरकाने लोळवले होते. या विजयासह ४ सामन्यांच्या बाॅर्डर-गावसकर चषक कसोटी मालिकेत भारताने २-० अशी आघाडी घेतली आहे.
१ बाद ६१ वरून पुढे खेळताना ऑस्ट्रेलियाने आपले उर्वरित ९ फलंदाज १९.१ षटकांच्या खेळामध्ये अवघ्या ५२ धावांत गमावले. ट्रॅव्हिस हेड (४३) आणि मार्नस लाबुशेन (३५) यांच्या व्यतिरिक्त ऑस्ट्रेलियाच्या एकाही फलंदाजाला दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही. काल ३९ धावांवर नाबाद असलेल्या हेडने आणखी ४ धावांची भर घातल्यावर अश्विनने त्याचा काटा काढला. चिवट फलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेल्या भरवशाच्या स्टीव्ह स्मिथलाही (९) अश्विननेच पायचित करून भारताला मोठे यश मिळवून दिले.
नंतर जडेजाने खरी कमाल केली. केवळ १६ चेंडूंच्या खेळात त्याने एकही धाव न देता लाबुशेन, मॅट रेनशाॅ (२), पीटर हॅण्ड्सकोम्ब (०) आणि कर्णधार पॅट कमिन्स (०) यांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले. यामुळे कांगारूंची अवस्था ३ बाद ९५ वरून ७ बाद ९५ अशी दयनीय झाली. पहिलीच कसोटी खेळणाऱ्या मॅथ्यू कुहेनमन याचे शून्यावर दांडके उडवून जडेजाने ऑस्ट्रेलियाच्या डावाला पूर्णविराम दिला. याबरोबरच त्याने या सामन्यात कारकिर्दीत एका डावातील तसेच सामन्यातील सर्वोत्तम कामगिरी नोंदवली.
विजयासाठी ११५ धावांचा पाठलाग करताना सलामीवीर के. एल. राहुल (१) पुन्हा अपयशी ठरला. त्यानंतर कर्णधार रोहितने वेगवान फलंदाजी करीत विजयाकडे कूच केले. मात्र, धावबाद झाल्याने त्याची खेळी संपली. रोहितने २० चेंडूंत २ षटकार आणि ३ चौकारांसह ३२ धावा केल्या. पुजारा-विराट ही जोडी भारताला विजय मिळवून देणार, असे वाटत असतानाच फिरकीपटू टाॅड मर्फीने विराटला चकवले. ३१ चेंडूंत ३ चौकारांसह २० धावा करणारा विराट यष्टिचित होऊन तंबूत परतला. श्रेयस अय्यरने १० चेंडूंत प्रत्येकी एक षटकार आणि एका चौकारासह १२ धावा केल्या. तो बाद झाल्यानंतर पुजारा-भरत जोडीने भारताचा विजय साकारला. वृत्तसंंस्था
संक्षिप्त धावफलक :
ऑस्ट्रेलिया : पहिला डाव : २६३
भारत : पहिला डाव : २६२
ऑस्ट्रेलिया :दुसरा डाव : ३१.१ षटकांत सर्व बाद ११३ (ट्रॅव्हिस हेड ४३, मार्नस लाबुशेन ३५, रवींद्र जडेजा ७/४२, रविचंद्रन अश्विन ३/५९).
भारत : दुसरा डाव : २६.४ षटकांत ४ बाद ११५ (चेतेश्वर पुजारा नाबाद ३१, रोहित शर्मा ३१, श्रीकर भरत नाबाद २३, विराट कोहली २०, श्रेयस अय्यर १२, केएल राहुल १, नाथन लियाॅन २/४९, टाॅड मर्फी १/२२).
सामनावीर : रवींद्र जडेजा (सामन्यात १० बळी आणि २६ धावा).