वरातीमागून घोडे
इंदू भगत
जी-२० राष्ट्रांच्या परिषदेस येणाऱ्या पाहुण्यांना नव्या जगातील पुण्याचे दर्शन व्हावे यासाठी महापालिकेने गाजावाजा करत गुळगुळीत रस्ते, सुशोभित चौक, आकर्षक रोषणाई करत त्यांचे लक्ष वेधून घेतले. मुळा-मुठा नदीपात्र सुधारणा प्रकल्पाची झलक दाखवण्यासाठी ३०० मीटरचा भाग १० जानेवारीपर्यंत पूर्ण करण्याचेही नियोजन केले. मात्र, हे नियोजन मुळा-मुठेच्या पाण्यात वाहून गेले असून ही प्रकल्पाची झलक अद्याप अपूर्णावस्थेत आहे. त्यातच नदीपात्र सुधारणा प्रकल्प नदीकाठाने संथ गतीने वाटचाल करत असल्याचे दिसते.
नदीपात्र सुधारणा प्रकल्पाचा छोटासा भाग हाती घ्यावयाचे कारण होते पुण्यात १६ व १७ जानेवारीला होणारी जी-२० परिषद. मूलभूत पायाविषयक कार्यगटाच्या या पहिल्या परिषदेस हजर राहण्यासाठी येणाऱ्या परदेशी पाहुण्यांना मुळा-मुठा नदीपात्र सुधारणा प्रकल्पाची झलक दाखविण्याचा आणि असे भव्य, सुंदर प्रकल्प भारतात होत असल्याची त्यांना जाणीव होऊन पुण्याची पर्यायाने देशाची प्रतिमा उजळावी हा या मागचा हेतू होता. त्यासाठी चिमा गार्डन ते बंडगार्डन ३०० मीटरचा छोटा भाग निवडून ते अल्पावधीत पूर्ण करण्याचे ठरवले होते. परिषद होऊन पाहुणे मायदेशी परतले असून पालिकेचे काम मागच्या पानावरून पुढे असे चालू आहे.
संगमवाडी पुलापासून मुंढवापर्यंतच्या ९ कि. मी. च्या भागात नदीपात्र सुधारणा प्रकल्प राबविण्यावर सध्या पालिका काम करत आहे. संगमवाडी पूल ते बंडगार्डन दरम्यानचा चार कि. मी. चा भाग आणि मुंढवा पुलापासून जॅकवेल (खराडी) दरम्यानच्या तीन कि. मी. च्या प्रकल्प कामास महापालिकेने प्राधान्य दिले आहे.
पाच टक्के काम पूर्ण
नदीपात्र सुधारणा प्रकल्पाचा कार्यभार असलेले युवराज देशमुख याविषयी मिररशी म्हणाले की, या प्रकल्पाच्या प्राथमिक भागास प्रारंभ करताना आम्ही चिमा गार्डन ते बंडगार्डन हा भाग पूर्ण करण्याचा प्रयत्न केला.
त्यातील पाच टक्के काम पूर्ण झाले आहे. नियोजनानुसार आम्ही काम करत असून त्याला विलंब होणार नाही. हा प्रकल्प ११ टप्प्यांत पार पाडला जाणार असून त्यातील ३ टप्प्यांचे काम एकावेळी सुरू आहे. या तीन टप्प्यांतील ९ कि. मी. चे काम जवळजवळ पूर्ण झाले आहे. पर्यावरणाचा समतोल साधत हा प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असल्याने आपण जास्तीत-जास्त नैसर्गिक साधनसामग्रीचा वापर करत आहोत.
‘मोठ्या प्रकल्पांना वेळ लागतो’
पुणे महापालिकेच्या पर्यावरण विभागातील अधिकारी मंगेश दिघे याबाबत म्हणाले की, नियोजनानुसार प्रकल्पाचे काम सुरू असून त्याला विलंब होण्याचे काही कारण नाही. हा दीर्घकालिन आणि मोठा प्रकल्प आहे. अशा प्रकल्पांना वेळ हा लागतोच. एवढेच नव्हे तर आता-आता धारा, ही राष्ट्रीय नदी परिषद पुण्यात झाली. परिषदेला पन्नास शहरांतील प्रतिनिधी उपस्थित होते. त्यावेळी झालेल्या कार्यशाळेत देशातील सुरू असलेल्या विविध नदी प्रकल्पांवर चर्चा झाली. आलेल्या प्रतिनिधींसाठी येरवडा येथील घाटावर अभ्याससहल आयोजित केली होती.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.