घरावरच उभारला शिवरायांचा पुतळा
#नागपूर
छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रती असणाऱ्या आदरापोटी नागपुरातील एका व्यक्तीने त्याच्या घरावरच महाराजांचा १४ फुटी अश्वारूढ पुतळा उभारला आहे. हातात तलवार घेऊन घोड्यावर स्वार झालेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करत त्याने शिवजयंती साजरी केली आहे.
हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती रविवारी राज्यभरात उत्साहात साजरी करण्यात आली. त्यानिमित्त नागपूर शहरातही जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले. शहरातील ढोल पथकांकडून वादन करून छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करण्यात येत आहे. नागपूरच्या अनिल देशमुख या शिवप्रेमी तरुणाने एक वेगळाच आदर्श घालून दिला आहे. त्याने चक्क आपल्या घरावरच शिवाजी महाराजांचा १४ फुटांचा अश्वारूढ पुतळा उभारला आहे. अनिल देशमुख याचे घर लोकांसाठी कुतूहल आणि अभिमानाचा विषय बनले आहे. त्याच्या घरासमोरून जाणारा प्रत्येकजण अदबीने झुकतो अन् नमस्कारही करतो. हा नमस्कार असतो छत्रपती शिवाजी महाराजांना. अनिल देशमुख हा हुडकेश्वर पिंपळ रोड येथे राहात असून त्याचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय आहे. अनिल याने आपल्या घरावरच छत्रपतींचा १४ फुटांचा पुतळा बसवला आहे. रविवारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करून अभिवादन केले आणि शिवजयंती साजरी केली.
अनिल याला लहानपणापासूनच छत्रपती शिवरायांचा इतिहास, व्यक्तिमत्त्व आणि विचारांविषयी प्रचंड आकर्षण आणि अभिमान होता. यातूनच घर बांधतानाच शिवरायांचा पुतळा उभारण्याचा विचार त्याच्या मनात आला. सार्वजनिक ठिकाणच्या पुतळ्यांची होणारी आबाळही त्याने सातत्याने पाहिली आहे. त्याच्या या कृतिशील विचारांचा त्याचे शेजारी आणि मित्रांनाही अभिमान आहे. तरुणांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने मार्गक्रमण करावे. सर्वांनी वादविवाद न करता आपल्या घरावरच पुतळा बसवावा. तरुणांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने मार्गक्रमण करावे, असा संदेश पुतळा उभारून अनिल देशमुख याने दिला आहे. वृत्तसंंस्था
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.