स्कूटी ७० हजारांची, नंबरसाठी मात्र कोटीचे उड्डाण
#सिमला
कोणाला कशाचे आकर्षण असेल आणि त्यासाठी किती पैसा खर्च करेल याचा काही भरवसा नाही. वाहनाच्या एखाद्या विशिष्ट नंबरसाठी लोक अधिक पैसे मोजायला तयार होतात. मात्र, केवळ नंबरसाठी किती पैसे मोजायचे यालाही काही मर्यादा असायला हव्यात. शेवटी हौसेला मोल नसते हेच खरं. एका स्कूटीच्या नंबरसाठी १ कोटी १२ लाखांची बोली लागली असून हा कोटी मोजावे लागणारा नंबर आहे एचपी-९९-९९९९. या नंबरसाठी आरक्षित रकम केवळ १ हजार होती. या नंबरच्या लिलावात २६ जणांनी भाग घेतला आणि या नंबरसाठी आतापर्यंत १ कोटी १२ लाख १५ हजार ५०० अशी सर्वोच्च बोली लागली आहे.
ही बोली कोणी लावली हे समजत नाही. मात्र, त्याने पैसे जमा केले नाही तर दुसऱ्या क्रमांकावरील बोलीदाराला तो क्रमांक मिळेल. ज्याने बोली लावली आहे त्याने पैसे जमा केले नाही तर त्याला काही दंड भरावा लागणार आहे. आता आम्ही बोली लावताना बोली रकमेच्या ३० टक्के रक्कम जमा करण्याची अट घालणार आहे. त्यामुळे पैसे जमा केले नाही तर ही रक्कम सरकार खात्यात जमा होईल.
वृत्तसंंस्था
स्कूटी ७० हजारांपासून पुढे
ज्यासाठी कोटीची उड्डाणे केली त्या स्कूटीची किंमत ७० हजार ते १ लाख ८० हजारांच्या दरम्यान आहे. कोरोनानंतर या स्कूटीच्या विक्रीत वाढ झाली आहे. एका वाहन विक्रेत्याच्या माहितीनुसार गेल्या चार महिन्यांत ३० ते ४० स्कूटींची विक्री झाली आहे. गेल्या वर्षी याच काळात केवळ ३ ते ४ स्कूटी विकल्या गेल्या होत्या.