यावेळी तरी महापौर मिळणार का ?
#नवी दिल्ली
महानगरपालिकांच्या निवडणुकीनंतर लांबत चाललेल्या महापौर आणि स्थायी समिती सदस्यांच्या निवडीला अखेर नवा मुहूर्त मिळाला आहे. २२ फेब्रुवारी रोजी दिल्लीचा महापौर निवडला जाणार आहे. दिल्ली सरकारने २२ फेब्रुवारी रोजी महापौरांची निवड केली जाणार असल्याचा प्रस्ताव समोर ठेवला असून नायब राज्यपाल व्ही. के. सक्सेना यांनीही त्याला संमती दिली आहे. महापौर उपमहापौर आणि स्थायी समिती सदस्यांच्या निवडीचा मुहूर्त यापूर्वी तीन वेळा हुकला आहे.
महानगरपालिका निवडणुका होऊनही अद्याप दल्लीला महापौर, उपमहापौर आणि स्थायी समितीचे सदस्य मिळालेले नाहीत. यापूर्वी तीन वेळा निवडीसाठी महानगरपालिकेची सर्वसाधारण बैठक घेण्यात आली होती. मात्र प्रत्येक वेळी गोंधळामुळे या निवडी लांबणीवर पडल्या आहेत. केवळ महापौर, उपमहापौरच नाही तर स्थायी समितीच्या ६ सदस्यांच्या निवडीचा मुद्दाही प्रलंबित राहिला आहे. दरम्यान राज्यपालांनी नियुक्त केलेल्या १० सदस्यांना महापौरपदाच्या निवडणुकीत मतदान करता येणार नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. या संदर्भात एक याचिका न्यायालयात दाखल करण्यात आली होती.
बैठकीसाठी २४ तासांपूर्वी नोटीस जारी करा
राज्यपाल नियुक्त सदस्यांच्या मतदानाबाबत निर्वाळा देतानाच न्यायालयाने महापौर निवडीपूर्वी २४ तास आधी सूचना जारी करण्याचे आदेशही दिले आहेत. या सूचनेत महापौर, उपमहापौर आणि स्थायी समिती सदस्यांच्या निवडीचा संपूर्ण कार्यक्रम जाहीर करण्यात यावा. आम आदमी पक्षाचे नेते डॉ. शैली ओबेराय यांनी या संदर्भात राज्यपाल नियुक्त सदस्यांना मतदानाचा हक्क नसावा, अशी मागणी करणारी याचिका न्यायालयात दाखल केली होती. नायब राज्यपाल सक्सेना यांच्या मते या निवडणुकीत राज्यपाल नियुक्त सदस्यांनाही मतदानाचा अधिकार असावा, असे सांगण्यात आले होते. वृत्तसंंस्था