विराटच्या विकेटवरून रंगला वाद
#नवी दिल्ली
ऑस्ट्रेलियाविरोधातील दुसऱ्या कसोटी सामन्यात दिग्गज भारतीय फलंदाज विराट कोहलीच्या विकेटवर मोठा वाद झाला. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतरही याची सर्वत्र चर्चा सुरू होती. मैदानावरील पंचांनी विराटची विकेट ढापली, अशी टीका अनेक स्तरांवरून करण्यात येत आहे.
विराट ४४ धावांवर खेळत असताना ऑस्ट्रेलियाचा पदार्पणवीर डावखुरा फिरकीपटू मॅथ्यू कुहनेमनचा चेंडू विराटच्या बॅट-पॅडला लागला. मैदानावरील नितीन मेनन यांनी पायचितचा निर्णय दिला. त्यावर विराटने रिव्ह्यू घेतला, पण रिप्लेमध्ये चेंडू प्रथम बॅटवर लागला की पॅडवर हे स्पष्ट होत नव्हते. त्यामुळे थर्ड अंम्पायरने ग्राउंड अंम्पायरचा निर्णय कायम ठेवला. यामुळे विराटला पॅव्हेलियनमध्ये परतावे लागले. सोशल मीडियावर काही क्षणांतच ही घटना व्हायरल झाली.
विराटने पंचांच्या निर्णयावर नाराजी दर्शवली. रिव्ह्यू घेतल्यानंतर तो ऑस्ट्रेलिया संघातील खेळाडूंकडे जाऊन याविषयी बोलताना दिसून आला. ड्रेसिंग रूममध्ये रिप्ले पाहिल्यानंतरही तो नाराज दिसून आला. क्रिकेटप्रेमी आणि तज्ज्ञांमध्ये या विकेटवरून संताप दिसून आला. बाद झाल्यानंतर काही वेळातच विराट ट्विटरवर ट्रेंड करू लागला. भारतीय क्रिकेट प्रेमींनी अंम्पायरच्या निर्णयाला चुकीचे ठरवले. भारताचा माजी क्रिकेटपटू वसीम जाफरनेही हा निर्णय चुकीचा असल्याचे मत व्यक्त केले.
या प्रकरणात तिसऱ्या पंचांनी मैदानावरील पंचांचा निर्णय कायम ठेवला. तिसर्या पंचांकडे मैदानावरील पंचांचा निर्णय रद्द करण्यासाठी कोणताही ठोस पुरावा नसतो, तेव्हा त्यांना मैदानावरील पंचांचा निर्णय कायम ठेवावा लागतो व त्यांच्याच निर्णयावर पुढे जावे लागते. मैदानावरील पंचांनी नाबाद ठरवले असते तर कोहलीला जीवदान मिळाले असते. या घटनेच्या निमित्ताने पंच नितीन मेनन यांनी अनेकदा विराटची विकेट ढापल्याचे स्मरण क्रिकेट फॅन्सकडून करून देण्यात आले.
मैदानी पंचांनी कोहलीला नाबाद दिले असते तर त्याला जीवदान मिळाले असते. चेंडू प्रथम कुठे लागला हे स्पष्ट होत नव्हते. तसेच चेंडू स्टंपला लागत होता की नाही या प्रकरणी डीआरएस अंम्पायर्सला कॉल देत होता. त्यामुळे नितीन मेनन यांनी आऊट दिले नसते, तर कदाचित कोहलीला आपला डाव पुढे चालू ठेवता आला असता. वृत्तसंंस्था