किम यांच्यानंतर त्यांची मुलगी सांभाळणार देश ?
#सेऊल
उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग ऊन हे अलीकडे सातत्याने आपल्या मुलीसोबत सार्वजनिक कार्यक्रमात हजेरी लावताना दिसत आहेत. त्यामुळे त्यांच्यानंतर उत्तर कोरियाच्या सत्तेची जबाबदारी त्यांच्या मुलीवर सोपवली जाणार असल्याची चर्चा रंगली आहे. किम यांच्या मुलीचे वय केवळ १० वर्ष आहे, मात्र उत्तर कोरियाच्या राजकारणातील घडामोडी पाहता तिथे काहीही घडू शकते, त्यामुळे किम आतापासून मुलीला राजकारणाचे धडे देत असल्याचे समोर आले आहे.
उत्तर कोरियाच्या लष्कराच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात केंद्रीय लष्करी आयोगासोबतच्या कार्यक्रमात हुकूमशहा किम जोंग ऊन यांनी सहकुटुंब हजेरी लावली होती. यावेळी त्यांच्यासमवेत त्यांची १० वर्षांची मुलगीही उपस्थित होती. किम आपल्या मुलीसोबत एका सामन्याचा आस्वाद घेतानाचे छायाचित्र समोर आले आहे. उत्तर कोरियाचे दिवंगत हुकूमशहा आणि किम यांचे वडील किम जोंग इल यांच्या स्मृतिदिनानिमित्त हा सामना आयोजित करण्यात आला होता. यापूर्वी किम एका आण्विक क्षेपणास्त्र प्रसारणाच्या कार्यक्रमात मुलीला सोबत घेऊन आले होते. किम टोक हुन असे त्यांच्या मुलीचे नाव आहे. आत्यंतिक सुरक्षा व्यवस्थेत तिचे शिक्षण सुरू आहे.
एका फुटबॉल सामन्याचा आस्वाद घेताना किम यांनी आपली मुलगी किम टोक हुनलाही सोबत घेतले होते. तिच्या शेजारी बसून ते सामन्याचा आस्वाद घेत होते. विशेष म्हणजे सत्तेच्या दावेदार मानल्या जाणाऱ्या लोकांत किम यांची बहीण किम यो जोंगचाही समावेश होतो. या सामन्यात किम यो जोंग हजर होत्या. मात्र त्यांना किम यांच्या रांगेत मान देण्यात आला नव्हता. त्यामुळेच कदाचित किम यांच्यानंतर किम टोक हुन ही उत्तर कोरियाची उत्तराधिकारी बनणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. वृत्तसंंस्था
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.