मुकेश अंबानी सोमनाथाच्या चरणी
#सोमनाथ
जगातील सर्वाधिक धनाढ्य व्यक्तींमध्ये रिलायन्स समूहाचे प्रमुख मुकेश अंबानी यांचा समावेश होतो. मुकेश अंबानी कुटुंबातील कोणता ना कोणता सदस्य प्रकाशझोतात असतो. या वेळी खुद्द मुकेश अंबानी प्रकाशझोतात असून त्याचे कारण त्यांनी दिलेल्या देणगीबद्दल आहे.
नुकताच त्यांच्या मुलाचा साखरपुडा झाला तेव्हा साऱ्या सोशल मीडियावर अंबानी समूहाचे राज्य होते. औद्योगिक विश्वातील विविध घडामोडींमुळे अंबानी कुटुंब प्रसिद्धीच्या झोतात असते. त्याशिवाय धार्मिक, सामाजिक, क्रीडा क्षेत्रातही ते सहभागी होत असतात. अंबानी कुटुंबातील सदस्यांचा धार्मिक ओढा अनेक वेळा आपण पाहिला आहे.
शनिवारी देशभर साजऱ्या झालेल्या शिवरात्रीनिमित्त रिलायन्सचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांनी आपला पुत्र आकाश अंबानीसह गुजरातमधील सोमनाथ मंदिराला भेट दिली. तेथे त्यांनी सोमनाथ महादेवाचा रुद्राभिषेक केला. त्यावेळी त्यांनी सोमनाथ मंदिर ट्रस्टला १ कोटी ५१ लाखांची देणगीही दिली.
सोमनाथाच्या दर्शनासाठी आलेले मुकेश आणि आकाश या पिता-पुत्राचे मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष पीके लाहिरी आणि सचिव योयेंद्र देसाई यांनी स्वागत केले. या वेळी ट्रस्टतर्फे अंबानी पिता-पुत्राचे शाल देऊन स्वागत करण्यात आले. या वेळी भोलेनाथाच्या रुद्राभिषेकाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये राजस्थानमधील राजसमंद येथील नाथद्वारातील प्रसिद्ध श्रीनाथजी मंदिरात जिओची फाईव्ह जी सेवा करण्याची घोषणा केली होती. दिवाळीनिमित्त त्यांनी तेथील ट्रस्टला दीड कोटींची देणगी दिली होती. सप्टेंबरमध्ये मुकेश अंबानी यांनी आंध्रातील तिरुमला येथील व्यंकटेश्वर मंदिराला दीड कोटींची देणगी दिली होती.
वृत्तसंंस्था