कसोटी रंगतदार अवस्थेत
#नवी दिल्ली
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा कसोटी सामना दुसऱ्या दिवसअखेर रंगतदार अवस्थेत पोहचला आहे. भरवशाचे फलंदाज अपयशी ठरल्यानंतर अक्षर पटेल आणि रविचंद्रन अश्विन यांनी केलेल्या फलंदाजीमुळे पाहुण्या ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात भारतावर अवघ्या एका धावेची आघाडी घेता आली. मात्र, दुसऱ्या डावात वेगवान फलंदाजी करीत कांगारूंनी भारतावर ६२ धावांची आघाडी घेतली.
ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावातील सर्व बाद २६३ धावांच्या उत्तरात भारताने ८३.३ षटकांत २६२ धावांची मजल मारली. फिरकी गोलंदाजांना पोषक असलेल्या अरुण जेटली स्टेडियमच्या खेळपट्टीचा दिग्गज ऑफ स्पिनर नाथन लियाॅनने पूरेपूर लाभ उचलत पाच बळी घेतले. त्याच्या कामगिरीच्या जोरावर कांगारूंनी मोठ्या आघाडीच्या दिशेने वाटचाल केली होती. मात्र अक्षर-अश्विन जोडीने आठव्या गड्यासाठी ११४ धावांची भागिदारी करीत कांगारूंचा अपेक्षाभंग केला. अक्षरने कसोटी कारकिर्दीतील तिसरे अर्धशतक झळकावताना शानदार ७४ धावांची खेळी केली. अश्विनने ३७ धावांची खेळी करीत त्याला मोलाची साथ दिली. प्रत्युत्तरात, ट्रॅव्हिस हेडच्या ४० चेंडूंतील नाबाद ३९ धावांच्या जोरावर दुसऱ्या दिवसअखेर १२ षटकांत १ बाद ६१ अशी मजल मारली.
शुक्रवारच्या बिनबाद २१ वरून पुढे खेळणाऱ्या रोहित-राहुल जोडीने भारताला ४६ धावांची सलामी दिली. मात्र ८ धावांच्या फरकाने तीन आघाडीचे फलंदाज बाद झाले. रोहित (३२), राहुल (१७) यांच्यानंतर शंभरावी कसोटी खेळणाऱ्या चेतेश्वर पुजाराला तर भोपळाही फोडता आला नाही. त्या पाठोपाठ पुनरागमन करणारा श्रेयस अय्यरही (४) बाद झाल्याने भारताचा डाव ४ बाद ६६ असा संकटात आला. हे चारही बळी लियाॅनने घेतले.
ही पडझड सुरू असताना विराट कोहलीने एक बाजू लावून धरली होती. रवींद्र जडेजासह पाचव्या विकेटसाठी ५९ धावांची भागिदारी करीत त्याने संघाला सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र १० धावांच्या फरकाने हे दोघेही बाद झाले. विवादास्पदरित्या बाद ठरवण्यात येण्यापूर्वी विराटने ८४ चेंडूंत ४ चौकारांसह ४४ धावा केल्या. यष्टीरक्षक-फलंदाज श्रीकर भरतच्या (६) रूपात आपला पाचवा बळी घेत लियाॅनने भारताला ७ बाद १३९ असे अडचणीत आणले.
फिरकीचे अस्त्र भारतावरच उलटून पहिल्या डावात कांगारू ७०-८० धावांची आघाडी घेणार, असे वाटत असतानाच अक्षर-अश्विन या अष्टपैलूंच्या जोडीने ऑस्ट्रेलियाच्या फिरकी माऱ्याचा समर्थपणे सामना केला. २९ वर्षीय अक्षरने ११५ चेंडूंत ७४ धावांची जबाबदार खेळी साकारताना ३ षटकार आणि ९ चौकार लगावले. अश्विनने ७१ चेंडूंत ५ चौकारांसह ३७ धावा केल्या.
भारताच्या पहिल्या डावातील १० पैकी ९ बळी अाॅस्ट्रेलियाच्या फिरकीपटूंनी घेतले. टाॅड मर्फी आणि पहिलीच कसोटी खेळणाऱ्या मॅथ्यू कुहनेमन यांनी प्रत्येकी २ बळी घेत लियाॅनला चांगली साथ दिली. ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात वाॅर्नरऐवजी वेगवान फलंदाजी करणाऱ्या हेडला सलामीला पाठवले. त्याने अपेक्षित फलंदाजी करताना ४० चेंडूंत १ षटकार आणि ५ चौकारांसह नाबाद ३९ धावा केल्या. जडेजाने उस्मान ख्वाजाला (६) बाद केल्यावरही ऑस्ट्रेलियाच्या धावांचा वेग कमी झाला नाही. वृत्तसंंस्था