आई-वडिलांचा परित्याग मुलाला पडला महागात

नायब तहसीलदार म्हणून निवृत्त झालेल्या वृध्द आणि त्याच्या पत्नीला पोटचा मुलगा-सून सांभाळत नसल्याने या वृध्द जोडप्याने शासनाचे दरवाजे ठोठावले आहेत. त्यानंतर तहसीलदारांनी दरमहा ठराविक रक्कम देण्याचे आदेश मुलगा आणि सुनेला दिल्यानंतरही वृद्ध दाम्पत्याची परवड थांबत नसल्याने आता देहूरोड पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Mon, 20 Feb 2023
  • 01:31 am
PuneMirror

आई-वडिलांचा परित्याग मुलाला पडला महागात

रोिहत आठवले

rohit.athavale@civicmirror.in

TWEET@RohitA_mirror

नायब तहसीलदार म्हणून निवृत्त झालेल्या वृध्द आणि त्याच्या पत्नीला पोटचा मुलगा-सून सांभाळत नसल्याने या वृध्द जोडप्याने शासनाचे दरवाजे ठोठावले आहेत. त्यानंतर तहसीलदारांनी दरमहा ठराविक रक्कम देण्याचे आदेश मुलगा आणि सुनेला दिल्यानंतरही वृद्ध दाम्पत्याची परवड थांबत नसल्याने आता देहूरोड पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

अनुपमा तुकाराम काळोखे (वय ६८, रा. देहूगाव) यांनी या प्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. काळोखे यांचा मुलगा गणेश तुकाराम काळोखे आणि सून राजश्री गणेश काळोखे यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. तुकाराम काळोखे हे पिंपरी-चिंचवड महापालिकेत नोकरी करीत होते. शासनाच्या सेवेतून ते नायब तहसीलदार म्हणून निवृत्त झाले आहेत. ऑगस्ट २०१८ पासून तुकाराम काळोखे हे आजारी असल्याने त्यांच्या एकट्याच्या पेंशनवर काळोखे दाम्पत्याचा उदरनिर्वाह होत नव्हता. तसेच औषधोपचारांसाठी काळोखे दाम्पत्य शेतातील घरातून गावात खोली भाडेतत्त्वावर घेऊन राहू लागले. आई-वडील शेतातील घरातून निघून गेल्याने गणेश आणि त्याच्या पत्नीने शेतातील घराचा ताबा घेऊन ते तिकडे राहू लागले. स्वतःचा मुलगा असल्याने काळोखे दाम्पत्याने शेतातील घराबाबत फार विचारणा केली नाही. मात्र, पेन्शनमध्ये उपचारांचा आणि भाडेतत्त्वावर घेतलेल्या घराचा खर्च भागविताना काळोखे दाम्पत्याची ओढाताण होत होती.

मुलाला घरातून बाहेर न काढता काळोखे दाम्पत्याने घरभाडे आणि उदरनिर्वाहासाठी काही पैसे देण्याची मागणी मुलाकडे केली. त्यानंतर हे प्रकरण तहसीलदार यांच्याकडे गेले. स्वतःचे घर आणि शेती मिळावी म्हणून काळोखे  दाम्पत्याने हवेलीच्या तत्कालीन तहसीलदारांकडे तक्रार केल्यानंतर उपविभागीय दंडाधिकारी यांनी काळोखे यांना दरमहा दहा हजार रुपये देण्याचे आदेश मुलगा गणेश याला दिले होते. तसेच आई-वडिलांचा सांभाळ करण्याचेही आदेश दिले होते. मात्र, या आदेशानंतरही गणेश याने आई-वडिलांचा सांभाळ तसेच ठरवून दिलेली रक्कम दिली नाही. तसेच आई-वडील राहात असलेल्या घरी जाऊन शिवीगाळ करणे, सपत्नीक आत्महत्या करण्याची धमकी देण्याचे प्रकार करीत असल्याने काळोखे  दाम्पत्याने देहूरोड पोलिसांकडे धाव घेतली. त्यानंतर आई-वडिलांचे व वरिष्ठ नागरिकांचा निर्वाह, कल्याण अधिनियम २००७ कलामांतर्गत अदखलपात्र गुन्हा गणेश आणि त्याच्या पत्नीवर दाखल करण्यात आला आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story