मृतदेह अर्धवट जळाला अन् विद्युतदाहिनीने टाकली मान
राजानंद मोरे
रात्री नऊची वेळ. कात्रज स्मशानभूमीमध्ये गॅसदाहिनीत एक मृतदेह जळत होता आणि अचानक दाहिनी बंद पडली. मृतदेह अर्धवट जळालेला असल्याने तिथला कर्मचारी घाबरला. दुरुस्तीसाठी धावाधाव सुरू झाली, पण संबंधितांकडून दाद मिळाली नाही. दोन तासांनी त्याने मनसेचे नेते वसंत मोरे यांच्याशी संपर्क साधला. त्यांनीही प्रयत्न केले. महापालिकेच्या अधिकाऱ्यांसह ठेकेदारांची झाडाझडती घेतल्यानंतर पुढील तासाभरात दुरुस्ती करून गॅसदाहिनी सुरू झाली.
कात्रज स्मशानभूमीमध्ये दोन गॅसदाहिनी आहेत. त्यावर दररोज मोठा ताण असतो. कात्रज परिसरासह गावठाण, आंबेगाव, भिलारेवाडी, मांगडेवाडीसह जवळच्या भागातील मृतदेह याच स्मशानभूमीत आणले जातात. त्यामुळे या विद्युतदाहिनी सतत सुरूच असतात. परिणामी तांत्रिक बिघाड होण्याचे प्रकार घडतच असतात, पण मंगळवारी रात्री नऊच्या सुमारास गॅसदाहिनीमध्ये मृतदेह असतानाच बंद पडल्याची घटना घडली.
मोटार जळाल्याने दाहिनी अचानक बंद पडल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. या दाहिनीच्या देखभाल-दुरुस्तीचे काम खासगी ठेकेदाराकडून केले जाते. दाहिनी अचानक बंद पडल्याने तेथील कर्मचाऱ्याला नेमका तांत्रिक बिघाड लक्षात आला नाही. त्याने काही वेळ सुरू करण्याचा प्रयत्न केला. ठेकेदारालाही फोन केले. त्यांनीही गांभीर्य दाखवले नाही. त्यामुळे मग त्यांनी वसंत मोरे यांना फोन केला.
याविषयी मोरे म्हणाले, कर्मचारी खूप घाबरला होता. दुरुस्तीसाठी ठेकेदाराकडील कर्मचारी सकाळी येतो, म्हणाले होते. ते सकाळी आले असते तर दाहिनीमध्ये अर्धवट जळालेला मृतदेह तसाच राहिला असता. नातेवाईकांना हा प्रकार समजला असता त्यावर मोठा गोंधळ झाला असता. सकाळी त्या मयताचे नातेवाईक राख सावडण्यासाठी येणार होते. यात त्या बिचाऱ्या कामगारांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या असत्या.
रात्री मी ठेकेदाराला फोन केला. त्याने आता माणसे नसल्याचे सांगितल्याने त्याला मी खूप झापले.त्यानंतर पालिकेचे अधिकारी श्रीनिवास कंदुल यांना फोन करून सर्व प्रकार सांगितला. जर दोन तासात अंत्यसंस्कार पूर्ण झाले नाहीत तर मी लाईव्ह येईन. मग पुढे जे होईल त्याला सर्वस्वी तुम्ही जबाबदार असाल, असे ठणकावले. मग तासाभरातच ठेकेदाराकडील कर्मचाऱ्यांनी दाहिनीची दुरुस्ती करून सुरू केल्याचे मोरे यांनी सांगितले.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.