‘श्रीमंती’चे आमिष दाखवून फसवणाऱ्यास अटक
रोिहत आठवले
TWEET@RohitA_mirror
नागरिकांना गुंतवणुकीतून ७५ दिवसांत चांगला परतावा देण्याच्या आमिषाने कोट्यवधींचा गंडा घालणाऱ्या "श्रीमंत बाजार प्रा. लि." च्या संचालकास अटक करण्यात आली आहे. सांगवी पोलिसांनी ही कारवाई केली असून, अनेक कष्टकऱ्यांनी यात पैसे गुंतवल्याचे आता उघड होत आहे.
श्रीकांत रामचंद्र आचार्य (वय ६०, रा. शुक्रवार पेठ, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या संचालकाचे नाव आहे, तर या प्रकरणी सत्यजित लहू हरपुडे (वय ३५, रा. सांगवी) यांनी फिर्याद दिली आहे. आचार्य याने "श्रीमंत बाजार प्रा. लि." नावाची कंपनी सुरू केली होती. या कंपनीत ३३,९९९ रुपये गुंतवले तर एक आयडी देऊन त्यापोटी ७५ दिवसांनी ५४ हजार रुपये देऊ, असे आमिष दाखवले होते. तसेच सुरुवातीला काही लोकांना विश्वास बसावा यासाठी आचार्यने गुंतवणूकदारांना दिलेल्या आश्वासनानुसार ३४ हजार रुपयांच्या बदल्यात ५४ हजार रुपये दिले. लोकांचा विश्वास संपादन केल्यावर त्याने गुंतवणूकदारांना एकापेक्षा अधिक आयडी (टोकन नंबर) घेऊन पैसे गुंतवण्यास सांगितले. गुंतवणूक केल्यावर अन्य काहीही कष्ट न करता ७५ दिवसांत २० हजार रुपये जास्तीचे मिळतील या आशेमुळे नातेवाईक आणि मित्रांना "श्रीमंत" कंपनीत पैसे गुंतवण्यास सांगितले. तसेच एखाद्याने गुंतवणूकदार आणल्यास त्याला १६०० रुपये अतिरिक्त देण्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदार वाढवले.
तक्रारदार हरपुडे यांनी सुरुवातीला ३३,९९९ रुपये गुंतविले होते. त्यानंतर त्यांना ठरलेली रक्कम दिली गेली. पुढे हरपुडे यांना अधिक गुंतवणूक करण्यास सांगून आचार्यने त्यांच्याकडून ३३ लाख ७० हजार रुपये घेतले. त्यानंतर पैसे परत दिले जातील यावर विश्वास बसावा म्हणून चार कोरे चेक दिले होते. मात्र, पैसे परत मिळत नसताना तसेच आचार्य याचा संपर्क होत नसल्याने हरपुडे यांनी चेक वटवण्याचा प्रयत्न केला असता, पैसे मिळाले नाहीत.
आचार्यने हरपुडे यांच्या व्यतिरिक्त राज्यभरातील अनेकांकडून अशाच प्रकारे पैसे घेतल्याने आणि गुंतवणूकदार पैसे परत मागू लागल्याने आचार्य पुण्यातून पसार झाला होता. गुंतवणूकदारांनी अखेर पोलिसांकडे धाव घेऊन आचार्य याच्या विरोधात फिर्याद दिली होती. त्यानंतर आचार्य पुण्यात आल्याची माहिती मिळताच पोलिसांनी त्याला अटक केली आहे. शेअर मार्केटमध्ये आम्ही पैसे गुंतवतो आणि त्यातून मिळणारा मोबदला तुम्हाला देतो, असे आम्हाला सांगितले होते. त्यानंतर वेळोवेळी माझ्यासह कुटुंब, मित्र तसेच राज्यातील अनेकांकडून कोट्यवधी रुपये घेऊन आचार्य पसार झाला होता. आम्ही त्याचा शोध घेत होतो. तो पुण्यात आल्याचे समजताच आम्ही याची माहिती पोलिसांना दिली आणि त्याला पकडून दिले आहे, अशी माहिती तक्रारदार सत्यजित हरपुडे यांनी "सीविक मिरर" शी बोलताना दिली.
आचार्यने फसवणूक केल्याची तक्रार आमच्याकडे येताच गुन्हा दाखल करण्यात आला. त्याच्या मागावर आम्ही होतो. तो गुन्हा दाखल झाल्यानंतर पसार झाला होता. तो पुण्यात आल्याचे समजताच अटक करण्यात आली असून, त्याच्याकडे तपास सुरू आहे अशी माहिती तपास अधिकारी पोलीस निरीक्षक सुनील तांबे यांनी दिली.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.