पडता मार, कारवाईला आली धार

शहरातील अनधिकृत जाहिरात फलकांची महापालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांनी गंभीरपणे दखल घेतली आहे. शहरात लोहगाव, वाघोली, हडपसर, औध या ठिकाणी अनधिकृत जाहिरात फलकांची आकडेवारी अधिक असल्याचे आयुक्तांना आढळून आले. आकाशचिन्ह विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांना आयुक्तांनी फैलावर घेत तत्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Fri, 24 Feb 2023
  • 08:24 am
पडता मार, कारवाईला आली धार

पडता मार, कारवाईला आली धार

क्षेत्रीय अिधकाऱ्यांना धारेवर धरताच नगर रस्त्यावरील कारवाईला अतिवेग; पंधरवड्यात १८ फलक हटवले

नितीन गांगर्डे 

feedback@civicmirror.in

शहरातील अनधिकृत जाहिरात फलकांची महापालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांनी गंभीरपणे दखल घेतली आहे. शहरात लोहगाव, वाघोली, हडपसर, औध या ठिकाणी अनधिकृत जाहिरात फलकांची आकडेवारी अधिक असल्याचे आयुक्तांना आढळून आले. आकाशचिन्ह विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांना आयुक्तांनी फैलावर घेत तत्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. 

अहमदनगर रस्ता, वडगाव शेरी क्षेत्रीय कार्यालयाकडून कारवाई करण्यास विलंब झाला होता. त्यामुळे येथील क्षेत्रीय अधिकारी तथा सहायक आयुक्त सोमनाथ बनकर त्यांच्याकडील क्षेत्रीय अधिकारी पद काढून घेण्यात आले. याचा धसका घेत इतर अधिकारी कामाला लागल्याचे दिसून येत आहे. पुणे शहरातील रस्त्यांवर जागोजागी अनधिकृत जाहिरातींचे फलक लावलेले दिसून येतात. शैक्षणिक क्लासच्या, विकसकांच्या, विविध राजकीय पक्षांच्या, रोजगार देण्यासंदर्भातील अशा अनेक प्रकारच्या जाहिरातींचे फलक  पाहावयास मिळतात. अगदी शहरातील वेगवेळ्या भागांची दिशा दाखवणाऱ्या महानगरपालिकेच्या फलकांवरही राजकीय नेत्यांच्या जाहिरातींचे फलक असलेले पाहावयास मिळते. अशा जाहिरातीखाली दिशाफलक झाकले असल्याने शहरात आलेल्या नवीन लोकांचा गोंधळ होत आहे. या अनधिकृत जाहिरातींच्या सुळसुळाटामुळे शहराचे विद्रुपीकरण होत आहे. 

महानगरपालिकेचे कर्मचारी कारवाई करत फलक हटवतात परंतू काही काळानंतर पुन्हा त्याठिकाणी अनधिकृत फलक लावले जातात. पुण्यात नुकत्याच झालेल्या जी-२० परिषदेच्या वेळी महानगरपालिकेने कारवाई करत शहरातील अनेक अनधिकृत जाहिराती फलक हटवले होते. जी-२० चे पाहुणे परताच पुन्हा जैसे थे चित्र झालेले पाहावयास मिळते. कायमस्वरूपी फलक हटवण्यात महानगरपालिकेला अजूनतरी यश मिळालेले नाही असे दिसत आहे .  

शहरातील अनधिकृत जाहिरात फलकांची महापालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांनी गंभीरपणे दखल घेतली आहे. अशा फलकांवर तातडीने कारवाई करून हे फलक हटवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. मात्र काही क्षेत्रीय कार्यालयांकडून ही कारवाई संथ गतीने होत आहे. अहमदनगर रस्ता, वडगाव शेरी क्षेत्रीय कार्यालयाकडून कारवाई करण्यास विलंब झाला होता. यामुळे महापालिका आयुक्तांनी आकाशचिन्ह विभाग आणि संबंधित क्षेत्रीय अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. येथील क्षेत्रीय अधिकारी तथा सहायक आयुक्त सोमनाथ बनकर त्यांच्याकडील क्षेत्रीय अधिकारीपद काढून घेण्यात आले. या पदाची जबाबदारी उपअभियंता नामदेव बजबळकर यांच्यावर सोपवण्यात आली आहे. यामुळे सर्व क्षेत्रीय कार्यालये खडबडून जागी झाली आहेत व पूर्ण क्षमतेने कामाला लागली आहेत.

महापालिका आयुक्तांनी अनधिकृत जाहिराती फलक हटवण्याच्या कारवाईवर गंभीरपणे लक्ष दिले आहे. प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाला कारवाईसाठी किमान मर्यादा देण्यात आली आहे. त्यासाठी आकाशचिन्ह विभागाकडून क्षेत्रीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांना शनिवारी आणि रविवारीदेखील कामावर हजर राहण्यास सांगितले जात आहे. नगररोड क्षेत्रीय कार्यालयाने कारवाई करत सर्व प्रकारचे बोर्ड, बॅनर, फ्लेक्स, तसेच मोठे अनधिकृत होर्डिंग लावणाऱ्यांना नोटीस बजावली आहे. हे सर्व अनधिकृत फलक काढून त्यांच्याकडून दंड आकारला जाणार आहे. त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. 

७ फेब्रुवारी ते २२ फेब्रुवारीपर्यंत १८०२५ चौरस फूट असलेल्या १८ अनधिकृत जाहिरात फलकांवर कारवाई कारण्यात आली आहे. १६ जाहिरातदारांकडून आठ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. उर्वरित जाहिरातदारांना दंड वसुलीची नोटीस बजावण्यात आली आहे. नगर रोड क्षेत्रीय कार्यालयातील प्रभारी महापालिका सहायक आयुक्त नामदेव बजबळकर, आकाश चिन्ह विभागाचे वरिष्ठ निरीक्षक संतोष गोंधळेकर, एकनाथ घिगे यांच्याकडून ही कारवाई करण्यात आली. जे जाहिरातदार दंड भरण्यास टाळाटाळ करतील,अशांच्या मिळकत करावर बोजा चढवण्यात येणार आहे. छोट्या-मोठ्या अनधिकृत जाहिरात फलकांवर यापुढेही अशीच कारवाई सातत्याने करण्यात येणार असल्याचे प्रभारी महापालिका सहायक आयुक्त, नगर रोड क्षेत्रीय कार्यालयाचे प्रभारी नामदेव बजबळकर यांनी दिली.

आगामी काळात शहरात जाहिरात फलक लावायचे असतील, तर त्यासाठीचे दर वाढविण्यात आले आहेत. महानगरपालिकेच्या आकाशचिन्ह विभागाकडून या बाबतचा प्रस्ताव बनवण्यात आला आहे. प्रतिचौरस फूट २२२ रुपये दर लागू होतो. यामध्ये २०१३ पासून २०२३ पर्यंत प्रत्येक वर्षी दहा टक्क्याने वाढ करण्यात आली आहे. नवीन दरानुसार प्रतिचौरस फूट ५८० होणार आहेत. याशिवाय नवीन महापालिका हद्दीसाठी नवीन दर प्रस्तावित करण्यात आले आहेत. मुख्य सभेने नुकतीच या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. त्यानुसार महापालिका प्रशासनाने यावर कार्यवाही करणे सुरू केले आहे.

नगर रोड वडगाव शेरी क्षेत्रीय कार्यालयाकडून जाहिरात फलकांवर कारवाई करण्यात कुचराई केली म्हणून महापालिका आयुक्तांनी क्षेत्रीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. तसेच क्षेत्रीय अधिकारी सोमनाथ बनकर यांची तडकाफडकी बदली देखील केली. आयुक्तांनी नवीन अधिकाऱ्यांना कारवाई कडक करण्यास सांगितले आहे. आयुक्तांच्या या भूमिकेने मात्र आकाशचिन्ह विभागाकडे काम करणारे कर्मचारी कामाला लागलेले दिसत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story