भुयारी मार्गातील बहुतांश दुकाने शटरबंद!
विशाल शिर्के
TWEET@vishal_mirror
वाहतुकीची कोंडी कमी व्हावी आणि वर्दळीच्या चौकांत नागरिकांना सुरक्षितपणे ये-जा करता यावी म्हणून महापालिकेने शहरात विविध ठिकाणी भुयारी पादचारी मार्ग तयार केले आहेत. रस्त्यावर विक्री करणाऱ्या विक्रेत्यांची सोय म्हणून तेथे काही दुकाने बांधली आहेत. त्यामुळे विक्रेत्यांची संख्या कमी होईल आणि भुयारी जागेचा चांगला वापर होईल असा अंदाज होता. मात्र, भुयारी मार्गातील बहुतांश दुकाने बंदच आहेत. कोठे भुयारी मार्ग उभारायचा यासाठी महापालिका विकासकामांच्या सल्ल्यासाठी कोट्यवधी रुपये मोजून सल्लागाराची नेमणूक करते. त्यानंतरही कोट्यवधींची विकासकामे कुलूपबंद राहत असतील तर असा बिनकामाचा सल्ला काय उपयोगाचा असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. असे प्रकल्प पालिका अभ्यासाशिवाय करते का की कोणाच्या हितासाठी अभ्यास चुकीचा केला जातो असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.
स्मार्ट योजनांच्या नावाखाली माननीय अनेक योजना राबवतात. त्यात भुयारी मार्गातील दुकानांचा समावेश होतो. कागदावर ही योजना सुंदर वाटत असली तरी तिचा प्रत्यक्षात वापरच होत नसल्याने ही योजना कुचकामी ठरली आहे. यापूर्वी एका माननीयांनी स्मार्ट बसस्टॉप आणला. तोच कित्ता शहरातील अनेक माननीयांनी गिरवला. त्यावर पाच ते सहा लाखांचा खर्च केला. त्यात मोफत वायफाय, सीसीटीव्ही अशा अत्याधुनिक सोयी दिल्या. मात्र, आज हे बसस्टॉप केवळ शोभेचे बाहुले बनले आहेत. त्याचबरोबर आय लव्हच्या फलकांनीही शहरात धुमाकूळ घातला आहे. त्याचा कित्ता अनेकांनी गिरवला. लाखो रुपये यात अडकून पडले. या योजना नेमक्या कशासाठी आणल्या असा अर्थपूर्ण शंका घेणारा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत.
कोथरूडमधील पौड रस्त्यावरील आयडियल कॉलनी नजीक पुणे स्मार्ट सिटी अंतगर्त भुयारी मार्ग साकारला आहे. आयडियल कॉलनीकडील नागरिकांना मोरे महाविद्यालयाच्या बाजूने तर, तेथील नागरिकांना पलीकडे जाता यावे हा यामागे उद्देश होता. तसेच, या परिसरात एमआयटीसारखी मोठी शैक्षणिक संस्थाही आहे. या विद्यार्थ्यांनाही रस्ता ओलांडताना फायदा व्हावा असा उद्देश होता. त्याच बरोबर भुयारी मार्गात काही अनुचित प्रकार घडू नयेत आणि तेथील स्वच्छता आपोआपच राखली जावी या हेतूने येथे आठ दुकाने काढण्यात आली. कोथरूडचे दर्शन घडविणारी चित्रेही भिंतीवर रंगवली आहेत. मात्र, दुकाने बांधून तीनवर्षांहून अधिक काळ लोटला आहे. तरीही त्यांचे शटर उचलले गेले नाही. हीच स्थिती शहरातील अनेक भुयारीमार्गातील दुकांनाची झाली आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.