नशा बेतली जिवावर
सीविक मिरर ब्यूरो
मद्य प्राशन केलेल्या दोन महाविद्यालयीन तरुणांचा पुणे-पानशेत रस्त्यावरील सोनापूर गावच्या हद्दीत खडकवासला धरणाच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली.
फरहान आलीम शेख (वय १८, रा. दिनेश हाईट्स शिवतीर्थनगर, कोथरूड) आणि साहिल विलास ठाकर (वय १९, शास्त्रीनगर, कोथरूड) अशी बुडून मृत्यू झालेल्या तरुणांची नावे आहेत. काही दिवसांपूर्वी याच ठिकाणी तरुण-तरुणीचाही बुडून मृत्यू झाला होता.
सोनापूर गावच्या हद्दीत खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात कोथरूड येथील पाच तरुण फिरण्यासाठी आले होते. सायंकाळी चारच्या सुमारास यातील फरहान आणि साहिल हे दोघे पोहण्यासाठी पाण्यात उतरले. पोहता येत नसल्याने आणि पाण्याचा अंदाज न आल्याने काही क्षणातच दोघेही बुडाले. इतर तरुणांनी आरडाओरड केल्याने ग्रामस्थांना माहिती मिळाली. सोनापूरचे ग्रामपंचायत सदस्य गोरक्ष पवळे यांनी तत्काळ याबाबत हवेली पोलीस ठाण्याला माहिती दिली.
‘‘पाचही तरुण पाण्याच्या कडेला मद्य प्राशन करत बसले होते. स्थानिक नागरिकांनी ही जागा धोकादायक असून येथे पाण्यात जाऊ नका, असे सांगितले होते. तसेच सोनापूर ग्रामपंचायतीने सदर ठिकाणी बोर्डही लावलेला आहे. असे असताना यातील दोन तरुण नशेत पाण्यात उतरले आणि त्यांचा बुडून मृत्यू झाला,’’ अशी माहिती स्थानिक नागरिकांनी दिली.
फायर ब्रिगेड जवानांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने शोध घेऊन बुडालेल्या दोन्ही तरुणांचे मृतदेह पाण्याबाहेर काढले. याबाबत हवेली पोलीस पुढील कार्यवाही करत आहेत.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.