राहुलचे उपकर्णधारपद काढले
#मुंबई
बाॅर्डर-गावसकर चषक कसोटी मालिकेतील पहिले दोन सामने जिंकणाऱ्या यजमान भारतीय संघाची उर्वरित दोन सामन्यांसाठी रविवारी (दि. १९) घोषणा करण्यात आली. या संघात कोणत्याही खेळाडूचा बदल नसला तरी कसोटीत सातत्याने अपयशी ठरत असलेला सलामीवीर के. एल. राहुलचे उपकर्णधारपद काढून घेण्यात आले आहे.
कसोटी मालिकेनंतर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठीही भारतीय संघाची घोषणा करण्यात आली असून हार्दिक पंड्याकडे प्रथम या प्रकारातील उपकर्णधारपद सोपवण्यात आले आहे. कौटुंबिक कारणांमुळे कर्णधार रोहित शर्मा पहिला सामना खेळणार नाही. यामुळे साहजिकच पहिल्या सामन्यासाठी पंड्या भारताचा कर्णधार असेल.
राहुलने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यात २०, १७ आणि १ अशी कामगिरी केली आहे. अशा स्थितीत त्याचे उपकर्णधारपद काढून घेण्यात आले आहे. उर्वरित दोन सामन्यांसाठी शुभमन गिलला संधी मिळू शकते. तो ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी जाहीर संघात असला तरी अद्याप त्याला संधी मिळालेली नाही. याशिवाय कसोटी संघात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. पहिले दोन कसोटी सामने न खेळलेले ईशान किशन, कुलदीप यादव, उमेश यादव आणि जयदेव उनाडकट संघात कायम आहेत. तिसरी कसोटी १ मार्चपासून इंदूरमध्ये तर चौथी कसोटी ८ मार्चपासून धर्मशाला येथे खेळवली जाणार आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिका संपल्यानंतर उभय संघांत ३ एकदिवसीय सामन्यांची मालिका रंगणार आहे. वृत्तसंंस्था.