तेलंगणा राज्य म्हणजे भारतातील अफगाणिस्तान
#मेहबुबाबाद (तेलंगणा)
तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (केसीआर) हे भारतातील तालिबान असून तेलंगणा भारतातील अफगाणिस्तान असल्याची जोरदार टीका वायएसआर तेलुगू पक्षाच्या प्रमुख शर्मिला रेड्डी यांनी रविवारी केली. मेहबुबाबादमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना त्या म्हणाल्या की, केसीआर हे हुकूमशहा, एककल्ली असून भारतीय घटनेची येथे अंमलबजावणी होत नाही. तेलंगणात केसीआर घटना चालते. तेलंगणा भारताचे अफगाणिस्तान असून केसीआर हे तालिबान आहेत.
मेहबुबाबादचे आमदार आणि भारत राष्ट्र समितीचे नेते शंकर नायक यांच्या विरोधात बदनामीकारक विधान केल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी शर्मिला रेड्डी यांना ताब्यात घेतले आहे. प्रक्षोभक भाषण करून शांतता भंग करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मेहबुबाबादमध्ये कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी शर्मिला रेड्डी यांना हैदराबादमध्ये हलविले आहे.
जाहीर सभेत शर्मिला रेड्डी यांनी आमदार शंकर नायक यांच्या विरोधात जोरदार टीका केली. त्या म्हणाल्या की, निवडून येण्यापूर्वी मतदारांना भरभरून आश्वासने दिली. दिलेल्या आश्वासनांची किती पूर्ण केली. आश्वासने पूर्ण केली नाही याचा अर्थ तुम्ही मर्द नाही.
आमदारांची बदनामी करणारी विधाने केल्याच्या निषेधार्थ भारत राष्ट्र समितीच्या कार्यकर्त्यांनी शर्मिला रेड्डी यांच्याविरोधात जिल्हाभर निदर्शने केली. वायएसआर तेलुगू पक्षाचे फलक, फ्लेक्स जाळण्याबरोबर कार्यकर्त्यांनी शर्मिला रेड्डी गो बॅक अशा जोरदार घोषणाही दिल्या. वृत्तसंंस्था