चौकीदारच निघाला चोर
रोिहत आठवले
TWEET@RohitA_mirror
सुरक्षा रक्षकाने चाकण एमआयडीसीमधील एका कंपनीत दरोड्याचा प्लॅन रचल्याचे उघडकीस आले आहे. चाकूच्या धाकाने ८०० किलो भंगार लुटून नेल्यानंतर तपासात सुरक्षा रक्षकाने साथीदारांच्या मदतीने हा दरोडा टाकल्याचे उघड झाले आहे.
दिलनवाज मोहम्मद शफिखान, (वय ५४, रा. बिरदवडी, ता. खेड. मूळ रा. बिहार) या सुरक्षा रक्षकाला पोलिसांनी अटक केली आहे. तर दिलनवाज याच्यासह त्याच्या पाच साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोरक्षनाथ गोविंद गायकवाड (वय ३६, रा. कुरुळी, ता. खेड) यांनी या प्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शुक्रवारी (१७ फेब्रुवारी) पहाटे दावडमळा चाकण येथील टेक्नोड्राय सिस्टीम इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत ही घटना घडली आहे. सुरक्षा रक्षकांना शस्त्राचा धाक दाखवून बांधून ठेवून कंपनीतील ८०० किलो भंगार साहित्य टेम्पोत भरून नेण्यात आले आहे.
दिलनवाज हा टेक्नोड्राय सिस्टीम इंजिनिअरिंग प्रा. लि. या कंपनीत सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होता. त्याने शुक्रवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास कंपनीत येऊन एका सुरक्षा रक्षकाला चाकूचा धाक दाखवून कंपनीचे गेट उघडले. त्यानंतर दुसरा सुरक्षा रक्षक नामदेव मरिबा भोगे याला धमकी देऊन दोरीने बांधून एक टेम्पो कंपनीत आणला. कंपनीतून ७०० किलो स्टेनलेस स्टील आणि १०० किलो माईल्ड स्टील असे एकूण ९१ हजार ३०० रुपये किमतीचे ८०० किलो भंगार साहित्य जबरदस्तीने चोरून नेले. सुरुवातीला दिलनवाज यानेदेखील दरोडेखोरांनी धाक दाखवून बांधून ठेवत लूटमार केल्याचा बनाव रचला होता. मात्र, सर्व सुरक्षा रक्षकांच्या चौकशीतून नेमका प्रकार समोर आला आहे. त्यानंतर पोलिसांनी दिलनवाज याला अटक केली आहे. सध्या त्याचे अन्य साथीदार हे लुटीच्या मुद्देमालासह पसार झाले आहेत.
एमआयडीसी भागातील चोरी आणि लूटमार रोखण्यासाठी आम्ही गस्त वाढविली आहे. तसेच रेकॉर्डवरील गुन्हेगार तपासणी करण्यात येत आहे. लूटमार आणि दरोडा होणार नाही यासाठी आम्ही प्रयत्नशील असतानाच ही घटना घडल्याची माहिती मिळाल्यावरच आम्हाला शंका आली होती. त्यामुळे घटना घडल्याची माहिती सांगणाऱ्याकडे आणि अन्य सुरक्षा रक्षकांना वेगवेगळे बसवून चौकशी केली तेव्हा खरा प्रकार समोर आला. अन्य आरोपींच्या मागावर आमची पथके पाठविण्यात आली आहेत, अशी माहिती चाकण पोलीस ठाण्याचे निरीक्षक वैभव शिनगारे यांनी "सीविक मिरर" शी बोलताना दिली. चाकण पोलीस तपास करीत आहेत.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.