पाणी बाणी
नितीन गांगर्डे
अन्न , वस्त्र आणि निवारा या माणसाच्या पायाभूत गरजा आहेत. मात्र या गरजांपेक्षाही जगण्यासाठी पाण्याची गरज महत्त्वपूर्ण असते. पिण्याचे पाणीच उपलब्ध नसेल तर जगण्याची कल्पनाही करता येत नाही. मांजरी बुद्रुकमधील एका ७५ वर्षांच्या महिलेला पिण्याच्या पाण्यासाठी दररोज दीड-दोन किलोमीटर भटकंती करावी लागत आहे. त्यांच्या या निसर्गदत्त अधिकाराबद्दल त्यांनी शक्य तिथे दाद मागितली आहे मात्र त्यांची ही मागणी ना पुणे महानगरपालिकेने पूर्ण केली आहे ना जिल्हाधिकारी त्यांना दिलासा देऊ शकले आहेत. कल्याणकारी राज्या'च्या गप्पा मारल्या जात असताना पुण्यासारख्या महानगरात द्रौपदा महादू आळंदकर यांना पाण्यासारख्या हक्काच्या गोष्टीसाठी संघर्ष करावा लागत आहे.
द्रौपदा महादू आळंदकर (७५ वर्ष) या मांजरी बुद्रुक येथील गोडबोले वस्तीत राहतात. या भागात लोकवस्ती येण्यापूर्वी हे त्यांचे शेत होते. त्यांची पाण्याची गरज शेतातील विहिरीवर भागायची. त्यामुळे त्यांना ग्रामपंचायतीच्या पाण्याची आवश्यकता वाटली नाही.
२०२१ साली भावकीच्या वादात त्यांची बोअरवेल आणि विहीर बुजवण्यात आली. त्यांना दोन वर्षांपासून पिण्यासाठी व वापरण्यासाठी पाणी मिळत नाही. तेंव्हापासून त्यांचा पाण्यासाठी संघर्ष सुरु आहे. द्रोपदा यांच्या मुलाचे आणि पती महादू यांचे निधन झाले आहे. त्यामुळे द्रोपदा एकट्याच घरी असतात. ७५ वर्ष वय असल्याने त्या आजारी असतात. अशा अवस्थेत त्यांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागतो आहे. पुणे शहरात असूनही त्यांना दररोज पाण्यासाठी तब्बल दीड ते दोन किलोमीटरची भटकंती करावी लागते. द्रोपदा या मूळच्या मांजरी गावच्याच रहिवासी आहेत. त्यांचे लग्न झाल्यापासून त्या इथे राहतात. पूर्वी मांजरी बुद्रुक या गावात ग्रामपंचायत होती. गतवर्षी त्याचा पुणे महानगरपालिकेत समावेश झाला आहे. अजूनही याठिकाणी महानगरपालिकेच्या पाण्यासारख्या मूलभूत सुविधा पोहचल्या नाहीत. त्याची झळ द्रौपदा यांना सोसावी लागत आहे.
द्रोपदा यांच्या घराच्या आजबाजूला सोसायट्या आहेत. त्या सोसायट्यांना पाण्यासाठी स्वतःचे बोअरवेल आहेत. गरज पडल्यास ते पाण्याचे टँकर मागवतात . द्रोपदा यांची आर्थिक परिस्थिती हालाखीची असल्याने टँकर मागविण्याची त्यांची कुवत नाही. वयस्कर व आजारी असल्यामुळे द्रौपदा यांना कुठे काम करता येत नाही. द्रौपदा यांचा सांभाळ त्यांची विधवा मुलगी करते. तिचीही आर्थिक परिस्थिती बेताची आहे. त्यातून त्या बचत करून आपल्या आईला अधून-मधून पाण्याचे जार विकत घेऊन देतात. मात्र द्रौपदा यांना नेहमी पाणी विकत घेणे परवडत नाही. द्रौपदा यांना पाण्याचा कोणताही स्रोत नसल्याने पिण्यासाठी पाणी विकत घ्यावे लागते. अांघोळ, कपडे, भांडी धुण्यासाठी त्या अर्धा किलोमीटर अंतरावरील सोसायटीतून पाणी आणतात. दोन्ही हातात पाच लिटर पाण्याचे ड्रम घेऊन त्यांना रोजच ही पायपीट करावी लागते. एकदा आणलेले पाणी पुरत नसल्याने त्यांना पाण्यासाठी अनेक फेऱ्या कराव्या लागतात.
पाणी ही जगण्याची मूलभूत गरज आहे. जगण्यासाठी ते अत्यावश्यक आहे. पाण्याला जीवन असेही म्हटले जाते. ज्या शहरात एक व्यक्ती दररोज सरासरी दोनशे लिटर पाणी वापरतो त्याच शहरात एका वृद्ध महिलेला दररोज दीड-दोन किलोमीटर भटकंती करावी लागते आहे. द्रौपदा यांनी घरी पाण्याचा नळ मिळावा म्हणून महानगपालिकेकडे त्यांनी २२ जुलै २०२२ रोजी अर्ज केला होता. परंतू त्यांना पाण्याची कोणतीही सोय उपलब्ध करून दिली गेली नाही. त्यानंतर त्यांनी २९ डिसेंबर २०२२ रोजी 'लोकशाही दिनात' आपली अडचण सांगण्यासाठी अर्ज केला. त्यालाही महानगपालिकेकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नसल्याची व्यथा द्रौपदा यांनी मांडली. 'पाणी ही जगण्याची मूलभूत गरज आहे. गेली दोन वर्षे मला पाणी मिळत नाही. मी या देशाची नागरिक नाही का? असा प्रश्न त्या विचारत आहेत.
द्रौपदा या माझ्या घरापासून सातशे मीटर अंतरावर राहतात. पाण्याची कोणतीच सोय नसल्याने त्या अनेकदा आमच्या घरी पाणी घ्यायला येतात. दोन्ही हातात दोन छोटेसे पाण्याचे ड्रम घेऊन पाणी घेऊन जातात. पाणी नेण्यासाठी त्यांना दिवसातून दोन-तीन फेऱ्या माराव्या लागत असल्याची माँहिती मांजरी गावातील मंगेश घुले यांनी 'सीविक मिरर'शी बोलताना दिली. 'द्रौपदा या वयोवृध्द आहेत. त्यांना चालायला त्रास होत असूनही पुण्यासारख्या शहरात त्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते हे वेदनादायी आहे. पाणी मिळण्यासाठी महानगरपालिकेला अर्ज करावा लागतो हेच चुकीचे आहे. पाणी पुरवठा करणे ही महानगरपालिकेची मूलभूत जबाबदारी आहे. त्यांनी पाणी पुरवठा केलाच नाही परंतू द्रौपदा यांच्या अर्जाला उत्तरही दिले नाही. द्रौपदा यांनी लोकशाही दिनात आपली अडचण सांगण्यासाठी अर्ज केला, त्यालाही कोणतेच उत्तर किंवा टोकण नंबर दिले गेले नाही हा लोकशाहीचा सर्वात मोठा पराभव असल्याची भावना सामाजिक कार्यकर्ते अनिल भांडवलकर यांनी व्यक्त केली. महानगरपालिका आयुक्तांनाच लोकशाही दिवसाचे गांभीर्य नसल्याचे स्पष्ट झाले आहे. महानगरपालिकेने द्रौपदा यांना एक पाण्याची टाकी देऊन त्यात निदान आठ दिवसाने टँकरने पाणी पुरवठा करून त्यांची या वयातली पाण्यासाठीची भटकंती थांबवावी, असेही भांडवलकर म्हणाले आहेत.
याविषयीची माहिती महानगरपालिकेतील संबंधित अधिकारी अनिरुद्ध पावसकर यांनी विचारले असता त्यांनी सांगितले, मांजरी गावात अजून सर्वत्र पाण्याच्या नळाचे जाळे उभारण्यात आलेले नाही. त्यामुळे तेथे प्रत्येक ठिकाणी पाणी देणे शक्य होत नाही. द्रौपदा यांचे घर नक्की कुठे आहे, त्यांनी कधी अर्ज केला आणि त्यांची काय अडचण आहे? हे माझ्या सहकाऱ्यांना विचारूनच सांगता येईल.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.