बॅट क्लब रोड
शहरात पारव्यांनी धुमाकूळ घातला आहे. त्यांचा त्रास आवरणे अजूनही शक्य झालेले नाही. हे कमी म्हणून की काय, गेल्या आठवडाभरापासून उच्चभ्रू बोट क्लब रस्त्यावर वटवाघळांच्या वस्तीने धुमाकूळ घातला आहे. रस्त्याशेजारीच दोन जुन्या झाडांवर त्यांनी शेकडोंच्या संख्येने वस्ती केल्याने खालून येणाऱ्या-जाणाऱ्यांच्या अंगावर थेट मल-मूत्र पडत आहे. तीव्र दर्पामुळे या परिसरातून चालणेही स्थानिक लोकांना अवघड झाले आहे. कोविड-१९ या जीवघेण्या आजाराला वटवाघूळ कारणीभूत असल्याच्या समजामुळे परिसरातील नागरिकांमध्ये सध्या भीतीचे वातावरण आहे.
परिसरात मेट्रोची कामे सुरू असल्यामुळे त्याचा मोठ्या प्रमाणात येणारा आवाज आणि तोडलेली झाडे यामुळे या वटवाघळांनी इथे आश्रय घेतलेला आहे. या झाडांचा पसारा रस्त्यावर आलेला आहे. त्यामुळे विष्ठा थेट रस्त्यावर पडते. वाहनचालक आणि पादचाऱ्यांच्या अंगावर घाण पडणे सामान्य गोष्ट बनली आहे. येथून चालताना नाकावर हात ठेवल्याशिवाय पर्यायच राहात नाही.
‘सीविक मिरर’ प्रतिनिधीने संबंधित ठिकाणी पाहणी केली. त्यात पादचारी आणि वाहनचालकांच्या अंगावर वटवाघळांची विष्ठा पडत असल्याचे दिसले. त्याचबरोबर परिसरातून जाताना प्रचंड दुर्गंधीचा सामना करावा लागतो. येथील वटवाघळे आकाराने मोठी असून सतत चिरक्या आवाजात ओरडत असतात.
“स्थानिक रहिवासी सूरज सालियन म्हणाले, ‘‘मोटारसायकलने किंवा पायी जाताना वटवाघळे अंगावर धावून येतील, अशी भीती वाटते. घरच्या टेरेसवरही ते येतात. मुले अनेकदा घाबरतात.
येथील नागरिकांचा त्रास कमी व्हावा म्हणून औषधांची फवारणी करण्यात येईल. ती काळजी आम्ही घेऊ. मात्र, अद्याप आमच्याकडे या प्रकाराबाबत तक्रार प्राप्त झालेली नाही.”
“वटवाघळांच्या शरीरात अनेक प्रकारचे विषाणू असतात. वटवाघळातून अशा विषाणूंचा प्रसार झाल्याची अनेक उदाहरणे आहेत. वटवाघूळ चावल्यास रेबीजही होऊ शकतो. त्यामुळे राष्ट्रीय विषाणू संस्थेने किमान येथे येऊन त्यांच्या विष्ठेची तपासणी करावी. त्यात गंभीर आजार पसरवणाऱ्या विषाणूंचा आढळ नाही ना, हे तपासले पाहिजे,’’ असे श्वसनविकार तज्ज्ञ डॉ. अमित द्रविड यांनी सुचवले.
‘‘वटवाघळांमुळे सार्स, कोविड, मर्स यांसारखे अनेक आजार पसरल्याचे निष्पन्न झाले आहे. कोविडसारखी इतर साथ येईलच, असे नाही. मात्र त्यामुळे कोणत्या साथरोगाची सुरुवात होऊ नये, याची दक्षता घेतली पाहिजे. खबरदारीचा उपाय म्हणून राष्ट्रीय विषाणू संस्थेने येथील नमुन्यांची तपासणी करावी,’’ असेही डॉ. द्रविड म्हणाले.
वृक्षप्रेमी विनोद जैन यांच्या मते, ‘‘वटवाघळांमार्फत माणसांना या विषाणूचा संसर्ग झाल्याचे बोलले जाते पण कोविडचा प्रसार नेमका कोणत्या प्राण्यांमुळे झाला, हे अद्यापही सिद्ध झालेले नाही. काहीही सिद्ध झाले नसले तरी, गेले काही दिवस वटवाघळे आणि कोविडच्या बातम्या कानावर येताहेत, तसतशी या पंख असलेल्या गूढ प्राण्याबद्दलची भीती वाढायला लागलीय. भारतात राजस्थानमध्ये याच भीतीने १५० वटवाघळे मारण्यात आली. इंडोनेशिया, अमेरिका या देशांतही अशा घटना घडल्या आणि जगभरातच वटवाघळांचा बचाव करण्याची वेळ आली आहे.”
“वटवाघळांमुळे साथरोग पसरण्याची भीती व्यर्थ आहे. कारण, आपल्याकडे संक्रमित होत असलेला कोविड हा वटवाघळांमुळे पसरलेला नाही, हे आपण लक्षात घ्यायला हवे. सध्या यावर बरेच संशोधन सुरू आहे,’’ असे जैन यांनी लक्षात आणून दिले. ‘नेचर’ या विज्ञानविषयक नियतकालिकात एक लेख प्रसिद्ध झाला आहे. यामध्ये कोविडचा विषाणू आणि वटवाघळांमध्ये असलेल्या कोरोना विषाणूमध्ये साम्य आढळले, तरी वटवाघळांमध्ये असलेला हा कोरोना आणि कोविड-१९ या आजाराचा थेट संबंध नाही, असे म्हटले आहे. वटवाघळांमध्ये आढळलेला विषाणू हा या कोरोना विषाणूचा पूर्वज आहे, असे या संशोधनातून समोर आले आहे, असेही जैन म्हणाले.
पक्षीतज्ज्ञ शीतल पारेख म्हणाल्या, “पश्चिम घाटात आधी वटवाघळांसाठी प्रसिद्ध असणाऱ्या अनेक गुहा होत्या. आता मात्र या गुहांमध्ये वटवाघळांच्या वसाहती नाहीत. त्यांचे जंगलांचे अधिवासही कमी होत चालले आहेत. या स्थितीत वटवाघळे मनुष्यवस्तीत येण्याचे प्रमाण वाढणार आहे आणि इथेच त्यांची शिकार होण्याचा धोकाही वाढतो. त्याचबरोबर माणसांना आजार फैलाव होण्याचा धोकाही.”
“निसर्गातील वटवाघळांचे महत्त्व आपण समजून घ्यायला हवे. रात्री फिरणारी ही वटवाघळे वेगवेगळी फळे खातात. त्यांच्या विष्ठेतून या फळांच्या बिया पुन्हा पडतात आणि उगवून येतात. म्हणजे जंगलातली किती नवी झाडे या वटवाघळांनी लावली असतील, याची कल्पना येते. वटवाघळांना यासाठी वृक्षारोपणाचे जीवनगौरव पुरस्कार द्यायला हवेत! वटवाघळे परागीकरण तर करतातच, शिवाय काही कीटक खाणाऱ्या वटवाघळांमुळे कीटकांची संख्या मर्यादित राहते. याचा फायदा शेतकऱ्यांना होतो,” असेही शीतल पारेख यांनी सांगितले.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.