फुकट्यांना पीएमपी शिकवणार आता चांगलाच धडा!
विनातिकीट प्रवास करून पीएमपीला खड्ड्यात घालणाऱ्या फुकट्या प्रवाशांना आता चांगलाच धडा शिकायला मिळणार आहे. फुकट प्रवास करणाऱ्यांना जरब बसावी यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) विनातिकीट प्रवास केल्याबद्दलच्या दंडाची रकम ३०० रुपयांवरून चक्क ५०० रुपये अशी वाढवली आहे.
पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या संचालकांची नुकतीच बैठक झाली. विनातिकीट प्रवास करणाऱ्यांना अद्दल घडावी आणि भविष्यात त्यांनी तिकिटाशिवाय प्रवास करू नये यासाठी दंडाच्या रकमेत २०० रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. या आधी असलेली ३०० रुपये ही दंडाची रकम आता ५०० रुपये करण्यात आली आहे. दंडाची रक्कम वाढविल्याने फुकट्या प्रवाशांना जरब बसेल, अशी आशा पीएमपी प्रशासनाला आहे.
दररोज १०० ते १५० फुकटे
पीएमपीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश बकोरियांनी संचालक मंडळाच्या बैठकीत हा प्रस्ताव मांडला होता. त्याला मंडळाने मान्यता दिली आहे. यापूर्वी तुकाराम मुंढे अध्यक्ष असताना त्यांनी २०१८ मध्ये दंडाची रक्कम १०० वरून ३०० रुपये केली होती. आता पुन्हा या रकमेत २०० रुपयांची वाढ करण्यात आली आहे. सध्या दर महिन्याला जवळपास दोन हजार फुकटे प्रवासी आढळून येत आहेत. मागील काही महिन्यांत विनातिकीट प्रवाशांमध्ये सातत्याने वाढ झाल्याचे दिसते. सध्या दररोज १०० ते १५० प्रवासी विनातिकीट आढळून येत आहेत.
पास विक्रीतून ७० कोटी उत्पन्न
पीएमपीमधून दररोज सुमारे ११ ते १२ लाख पुणेकर प्रवास करतात. नियमित प्रवाशांसाठी मासिक, त्रैमासिक, वार्षिक पासची व्यवस्था आहे. प्रामुख्याने विद्यार्थी व नोकरदारांकडून हा पास घेतला जातो. त्याचप्रमाणे दैनंदिन पासही दिला जातो. पास विक्रीतून पीएमपीला वर्षभरात ६५ ते ७० कोटी रुपये आगाऊ मिळतात. तिकीट विक्रीतून मिळणारे वर्षभरातील उत्पन्न तब्बल सव्वा दोनशे कोटींच्या घरात जाते.
हजारो फुकट्या प्रवाशांचा फटकाही पीएमपीला बसत आहे. सप्टेंबर महिन्यात तर पीएमपीने केलेल्या कारवाईत या प्रवाशांकडून तब्बल साडे तेरा लाख रुपयांची विक्रमी वसुली केली. प्रवासी आकडा जवळपास साडे चार हजार एवढा होता.
याविषयी पीएमपीचे जनसंपर्क अधिकारी सतीश गाटे म्हणाले, ‘संचालक मंडळाने फुकट्या प्रवाशांसाठीचा दंड वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार विनातिकीट प्रवाशांना यापुढे ५०० रुपये दंड आकारण्यात येईल. दंडाच्या रकमेतून पीएमपीचे उत्पन्न वाढावे हा यामागचा उद्देश नाही. विनातिकीट प्रवाशांवर जरब बसावी, त्यांचे प्रमाण कमी व्हावे, या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे.’ दरम्यान, दंडाची रक्कम वाढविल्यास फुकटे प्रवासी कमी होतील, हा पीएमपी प्रशासनाचा दावा यापूर्वी फोल ठरलेला आहे.
दंडामुळे फुकटे घटतील?
मुंढे यांच्या काळात दंडाची रक्कम वाढविल्यानंतर फुकटे प्रवासी कमी झाल्याचा दावा प्रशासनाने केला होता. प्रत्यक्षात कारवाईच कमी होत असल्याचे समोर आले होते. २०१७-१८ मध्ये सुमारे ६५ हजारांहून अधिक फुकटे प्रवासी आढळून आले होते. दंड वाढविल्यानंतर हा आकडा २५ हजार ५०० एवढा होता. त्यामुळे विनातिकीट प्रवासी कमी झाल्याचे प्रशासनाने त्यावेळी सांगितले होते. म्हणजेच दररोज २ हजारांहून अधिक प्रवासी आढळून येत होते. हे प्रमाण आजही कायम आहे. तिकीटतपासनीस पथकांवर होणारा खर्चही त्यापेक्षा अधिक होतो. तरीही फुकटे प्रवासी कमी झालेले नाहीत. त्यामुळे प्रत्यक्षात ५०० रुपयांच्या दंडाची प्रत्यक्षात अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर अशा प्रवाशांना किती लगाम बसेल, हे काही दिवसांतच समोर येईल.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.