भावी शिक्षकांच्या स्वप्नांवर दराडेंचा दरोडा
#पुणे
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त शैलजा दराडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कायमस्वरूपी नोकरी लावण्याचे आमिष दाखवून शिक्षकांकडून लाखो रुपये उकळल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. शैलजा दराडे या शिक्षण संचालक म्हणून कार्यरत असताना २०१९ साली त्यांनी राज्यातील ४५ शिक्षकांकडून प्रत्येकी १२ ते १५ लाख रुपये घेतल्याचा आरोप आहे. त्यांच्यासह त्यांच्या भावावरदेखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
डी.एड. झालेल्या शिक्षकांना कायमस्वरूपी नोकरी लावण्यासाठी १२ लाख, तर बी. एड. झालेल्या शिक्षकांकडून १४ लाख रुपये शैलजा दराडे या त्यांचा भाऊ दादासाहेब दराडेमार्फत घेत होत्या. सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील शिक्षक पोपट सूर्यवंशी यांनी याबाबत पुण्यातील हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोपट सूर्यवंशी यांच्या नात्यातील दोन महिला शिक्षकांना नोकरी लावण्यासाठी प्रत्येकी १४ आणि १२ लाख रुपये दादासाहेब दराडे याने घेतले होते. दोन भरती प्रक्रिया पार पडल्यानंतरदेखील नोकरी न लागल्याने पोपट सूर्यवंशी यांनी पैसै परत मागितले. मात्र दादासाहेब दराडे आणि शैलजा दराडे यांनी पेसै परत देण्यास नकार दिल्याने पोपट सूर्यवंशी यांनी न्यायालयात धाव घेतली. त्यानंतर न्यायालयाने या प्रकरणात गुन्हा दाखल करून चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. शैलजा यांना त्यांचा भाऊ दादासाहेब दराडे याचा कारनामा समजल्यानंतर त्यांनी भावाशी संबंध तोडले होते. भावाने त्यांच्या पदाचा फायदा स्वत:च्या फायद्यासाठी करून घेतला आहे.
कायमस्वरूपी नोकरी लावण्याचे आमिष दाखवून शिक्षकांकडून पैसे मागवले होते. मात्र शिक्षकांना नोकरी न मिळाल्याने त्यांनी विचारपूस करण्यास सुरुवात केली. त्यावेळी आरोपी म्हणजेच शैलजा दराडे आणि त्यांचा भाऊ दादासाहेब दराडे यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे शिक्षकांनी पैसे परत मागण्यासाठी वारंवार फोन केले. त्यानंतरही त्यांनी शिक्षकांचे पैसे परत केले नाहीत. मात्र तरीही काही दिवस शिक्षकांनी फोनवरून पैसे मागण्याचा प्रयत्न केला.
feedback@civicmirror.in
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.