शिवसेनेचे नाव, चिन्ह शिंदे गटाकडे
#नवी दिल्ली
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाबाबत सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय अद्याप आलेला नसतानाच केंद्रीय निवडणूक आयोगाने शुक्रवारी (दि. १७) मोठा निर्णय घेताना शिवसेनेचे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला बहाल केले. केंद्रीय निवडणूक आयोगाचा हा निर्णय उद्धव ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानण्यात येत आहे.
शिंदे यांच्या बंडानंतर उद्धव ठाकरे यांचे सरकार उलथवून राज्यात सत्तांतर झाल्यावर शिवसेनेचे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह कोणाचे, यावरून वाद निर्माण झाला होता. या प्रकरणी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात आली होती. दुसरीकडे, सर्वोच्च न्यायालयात राज्यातील सत्तांतराशी संबंधित विविध याचिकांची सुनावणी सुरू आहे. यावर सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आल्याशिवाय शिवसेनेचे नाव आणि धनुष्यबाण या चिन्हाबाबत निर्णय देऊ नये, अशी मागणी ठाकरे गटाने निवडणूक आयोगाकडे केली होती. ती मान्य करण्यात आल्यावरही शुक्रवारी केंद्रीय निवडणूक आयोगाकडून हा निर्णय आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
शिंदे यांनी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत मिळून सत्तांतर घडवून आणलं होतं. या घडामोडींनंतर ठाकरे गट केंद्रीय निवडणूक आयोग आणि सुप्रीम कोर्टात गेला होता. आठ महिन्यांपासून याबाबत सुनावणी सुरू आहे. निवडणूक आयोगात याबाबतचा युक्तिवाद पूर्ण झाला होता. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल मात्र अद्याप आलेला नाही.
धनुष्यबाण चिन्ह आपल्याला मिळावे, यासाठी दोन्ही गटांनी कागदोपत्री पुरावे सादर केले होते. त्यावर निवडणूक आयोगाने शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी काळात राज्यामध्ये महापालिका आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. त्या अगोदर शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह मिळाल्यानं मोठा दिलासा मिळाला आहे. पक्षचिन्हासोबतच शिवसेना नावदेखील शिंदे गटाला मिळाले आहे.
अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या आधी निवडणूक आयोगाने तात्पुरता निर्णय घेताना दोन्ही गटांना वेगवेगळे नाव आणि चिन्ह दिले होते. शिंदे यांच्या गटाला बाळासाहेबांची शिवसेना हे नाव तर ठाकरेंच्या गटाला शिवसेना - उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव देण्यात आले होते. शुक्रवारी मात्र या मुद्द्यावर अंतिम निर्णय देताना निवडणूक आयोगाने आपले वजन शिंदे गटाच्या पारड्यात टाकले.
शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह आपल्यालाच मिळावे, यासाठी शिंदे आणि ठाकरे या दोन्ही गटांकडून केंद्रीय निवडणूक आयोगात जोरदार युक्तिवाद करण्यात आला. एकनाथ शिंदे गटाच्या वकिलांनी आमच्याकडे सर्वाधिक लोकप्रतिनिधी असल्याचा युक्तिवाद केला होता. तर दुसरीकडे ठाकरे गटाच्या वकिलांनी पक्षाची घटना, राष्ट्रीय कार्यकारिणी, प्रतिनिधी सभा या बद्दलचे मुद्दे मांडत जोरदार युक्तिवाद केला होता. पण ठाकरे गटाचे प्रयत्न निष्फळ ठरले.
वृत्तसंंस्था
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.