ठाकरे गट, भाजप कार्यकर्त्यांत हाणामारी
रोिहत आठवले
TWEET@RohitA_mirror
शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे शहरप्रमुख ॲड. सचिन भोसले आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये प्रचारादरम्यान थेरगाव येथे बुधवारी (२२ फेब्रुवारी) संध्याकाळी भररस्त्यात हाणामारी झाली होती. या प्रकरणी भाजपच्या दोन कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली असून, पाचजणांवर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी भोसले कुटुंबीयांसह अकराजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ॲड. सचिन भोसले यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, जयदीप संपत माने (वय ४०), आकाश हेगडे (वय ३१), सनी चव्हाण (वय २३), करण अहीर (वय २५), अक्षय कास्तार (२५, सर्व रा. वाकड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील आकाश हेगडे आणि सनी चव्हाण यांना पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोसले हे बुधवारी सायंकाळी साडेपाच ते सहा या कालावधीत महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार करीत असल्याचा राग मनात धरून भाजपचे कार्यकर्ते जयदीप माने, आकाश हेगडे, सनी चव्हाण, करण अहीर, अक्षय कास्तार यांनी संगनमताने भोसले यांचा रस्ता अडवला. त्यावेळी बाजूला सरकण्यास हात केल्याच्या कारणावरून आरोपींनी भोसले यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच, भोसले यांच्या सोबतचे कार्यकर्ते गोरक्षनाथ पाषाणकर यांनाही दुखापत केली व शिवीगाळ करून जखमी केले. भोसले यांच्या विरोधात आकाश बापू हेगडे (वय ३१, रा. थेरगाव) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार, सचिन भोसले, त्यांची पत्नी, मुलगा, चुलती तसेच भोसले यांचा बाॅडीगार्ड व त्यांचे पाच ते सहा कार्यकर्ते यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हेगडे व त्यांचे मित्र बुधवारी सायंकाळी पावणे सहाच्या सुमारास थेरगाव येथे असताना सचिन भोसले हे त्यांच्या पाच ते सहा कार्यकर्त्यांसह आले. त्यांनी हेगडे यांना प्रचाराचा आवाज कमी करायला सांगून शिवीगाळ केली. तसेच, लाथाबुक्क्यांनी मारहाण करून हेगडे यांना जखमी केले. दोन्ही गुन्ह्यांचा तपास वाकड पोलीस करीत आहेत.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.