मुंबई हल्ल्याचे गुन्हेगार तुमच्याकडे मोकाट फिरताहेत
#नवी दिल्ली
कुणाचीही भीडभाड न ठेवता परखड बोलण्यासाठी प्रसिद्ध असलेले बॉलिवूडमधील दिग्गज गीतकार जावेद अख्तर यांनी ‘मुंबई हल्ल्याचे गुन्हेगार तुमच्या देशात मोकाट फिरत आहेत,’ असे पाकिस्तानला त्यांच्याच देशात सुनावण्याची जिगर दाखवली.
लाहोर येथे आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात ही घटना घडली. हा कार्यक्रम प्रसिद्ध उर्दू कवी फैज अहमद फैज यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात जावेद अख्तर यांना निमंत्रित करण्यात आले होते. एका प्रश्नाच्या उत्तरात २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याबद्दल जावेद अख्तर म्हणाले, ‘‘आपण एकमेकांना दोष देणं थांबवलं पाहिजे, त्यामुळे कोणतीही समस्या सुटणार नाही. आम्ही मुंबईकर आहोत, आम्ही पाहिलं आहे तेव्हा मुंबईवर कशा पद्धतीने हल्ला झाला होता. ते दहशतवादी नॉर्वे किंवा इजिप्तमधून आलेले नव्हते. ते अजूनही तुमच्या देशात मोकाट फिरत आहेत. ही खदखद भारतीयांच्या मनात असेल तर त्याचं तुम्ही वाईट वाटून घ्यायला नको.” या मेळाव्यात पाकिस्तानच्या चित्रपट तसेच कला, साहित्य क्षेत्रातील मान्यवर आणि सेलिब्रिटी उपस्थित होते.
‘‘आम्ही भारतात नुसरत फतेह अली खान आणि मेहदी हसन यांचे मोठे कार्यक्रम केले आहेत. दुसरीकडे लता मंगेशकर यांचा एकही कार्यक्रम तुमच्या देशात झालेला नाही,’’ असेही अख्तर यांनी सुनावले. वृत्तसंंस्था
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.